Pune News : बुधवार पेठ परिसरातील दुकानांत एफडीएची कारवाई; ५१२ किलो मिठाई जप्त करून नष्ट
या कारवाईत एकूण ५१२.१ किलो मिठाई, अंदाजे दोन लाख ८८ हजार २०० रुपये किमतीचा साठा जप्त करून नाशवंत असल्याने जागेवरच नष्ट करण्यात आला.

Pune News – बुधवार पेठ परिसरात आठ मिठाई विक्री व उत्पादन आस्थापनांची अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) वतीने तपासणी करण्यात आली. या कारवाईत एकूण ५१२.१ किलो मिठाई, अंदाजे दोन लाख ८८ हजार २०० रुपये किमतीचा साठा जप्त करून नाशवंत असल्याने जागेवरच नष्ट करण्यात आला.
दोन आस्थापनांमध्ये आवश्यक परवाना अथवा नोंदणीशिवाय व्यवसाय सुरू असल्याचे आढळल्याने व्यवसाय बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली. तपासणीदरम्यान एकूण १७ अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले.
परिमंडळ ६ अंतर्गत मंत्री किशोर आर्केड येथील श्रीमंत पेढेवाले या आस्थापनेतून मोतीचूर लाडू, खव्याचे मोदक आणि उकडीचे मोदकचे तीन नमुने घेऊन २१५.१ किलो मिठाई, एक लाख १८ हजार ८० रुपये किमतीचा साठा नष्ट करण्यात आला.
श्री मंगल मूर्ती या आस्थापनेत खव्याचे मोदक, तळलेले मोदक आणि बेसन लाडू असे तीन नमुने घेऊन १९५ किलो, एक लाख १७ हजार रुपये किमतीची मिठाई जप्त करून नष्ट केला. या आस्थापनेला व्यवसाय बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली.
श्री मंगलमूर्ती फ्लॅट क्र. १३, २६७, श्रीकृष्ण कॉम्प्लेक्स, येथील आस्थापनाचीही तपासणी करण्यात आली. तर धारवाडी पेढे स्वीट्स अँड स्नॅक्स येथे मोतीचूर लाडू, खव्याचे मोदक आणि उकडीचे मोदक असे तीन नमुने घेण्यात आले. या आस्थापनेतून ४३ किलो, २३ हजार ८४० रुपये किमतीची मिठाई नष्ट केली.
परिमंडळ ८ अंतर्गत जय गणेश स्वीट सेंटर येथे खव्याचे मोदक, बेसन लाडू आणि मोतीचूर लाडू असे तीन नमुने घेऊन ३५ किलो, २० हजार ४०० रुपये किमतीची मिठाई जप्त करण्यात आली.
अथर्व स्वीट सेंटर येथेही अस्वच्छता आढळल्याने खव्याच्या मोदकाचा नमुना घेण्यात आला. २४ किलो, आठ हजार ८८० रुपये किमतीची मिठाई जप्त केली.
हर्षवर्धन मिठाई उत्पादन केंद्र हे नोंदणी प्रमाणपत्राशिवाय कार्यरत असल्याचे तपासणीत आढळले. या प्रकरणी ३० नोव्हेंबर रोजी तडजोड अर्ज दाखल करण्यात येणार आहे. श्री कृपा दुग्धालय येथून मलाई मोदक पेढा, केशरी मोदक पेढा, कंदी मोदक पेढा आणि सुटे म्हशीचे दूध असे चार नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले.
ही कारवाई सहआयुक्त (दक्षता) प्रीती टिपरे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक आयुक्त (अन्न) ना. रा. सरकटे आणि सय्यद इम्रान हश्मी यांच्या मार्गदर्शनात तसेच सहआयुक्त (अन्न) श्रीकांत करकळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.






