Pune News : बापानेच केला पोटच्या लेकराचा खून, फुरसुंगी परिसरातील घटना

पुणे : फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वडकी येथील वलवा वस्ती परिसरात कौटुंबिक वादातून एका ३५ वर्षीय तरुणाचा वडिलांकडून खून झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात वडिलांवर भारतीय न्याय संहिते अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
मनोहर ताबाजी डोके (३६ ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या मेव्हण्याचा खून झाल्याप्रकरणी त्यांनी सासऱ्याविरुध्द तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास कैलास नगर, वलवा वस्ती येथील राहत्या घरी त्यांचे सासरे सुरेश बाबुराव जमदाडे (५९) यांनी मुलगा प्रशांत सुरेश जमदाडे (३५) यास शिवीगाळ करत गंभीर मारहाण केली.
या वादात प्रशांतला जमिनीवर पाडून गमजाच्या सहाय्याने गळा दाबून आणि डोकं जमिनीवर आपटून ठार मारले. घटनेची माहिती मिळताच उपायुक्त सोमय मुंडे, सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, वरिष्ठ निरीक्षक अमोल मोरे, पोलीस निरीक्षक संजय पतंगे दाखल झाले होते. त्यांनी आरोपीस ताब्यात घेतले. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नानासाहेब जाधव हे करत आहेत.
रागाच्या भरात केला खून
आरोपी आणि मृत हे दोघेही मजुरी काम करतात. आरोपीच्या पत्नीला अर्धांगवायूचा झटका आल्याने मागील दोन वर्षे त्या घरीच आहे. मृत प्रशांत नेहमी मद्यपान करुन घरच्यांना त्रास देत होता. यामुळे घरात नेहमीच वाद होत होते. रविवारी रात्रीही वाद झाल्यावर रागाच्या भरात वडिलांनी मुलाचा खून केला.





