Pune News : कंटेनर कारचा भीषण अपघात, तरुणाचा मृत्यू

फुरसुंगी : हडपसर -सासवड राष्ट्रीय महामार्गावर फुरसुंगी पावर हाऊस येथे काल मध्यरात्री कंटेनर व कारचा भीषण अपघात होऊन या दुर्घटनेत कार मधील एका युवकाचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना मंगळवारी मध्यरात्री २.३०च्या सुमारास घडली असून या अपघातात अक्षय बाळासाहेब चीव्हे (वय- ३१, रा. संयोग कॉलनी काळेपडळ/अपेक्षा लॉन्स जवळ पावर हाऊस फुरसुंगी) या युवकाचा अपघातात मृत्यू झाला.
रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास अक्षय चीव्हे हा स्विफ्ट कार मधून (एम एच १२ एस एल ६७७७) हडपसर कडून फुरसुंगी येथे त्याच्या घरी जात असताना पावर हाऊस फुरसुंगी येथे समोरून येणारा कंटेनर(जी जे १५ ए व्ही ६५८६) ची कारला समोरून जोरदार धडक झाल्याने कारचा चक्काचुर झाला या अपघातात अक्षय गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडले.
या प्रकरणी बाळासाहेब महादेव चीव्हे यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अपघातानंतर पोलीस उपायुक्त संभाजी कदम, पोलीस निरीक्षक जगताप पोलीस उपनिरीक्षक विनायक गुरव, फुरसुंगी वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक माने व कर्मचारी यांनी तत्काळ घटनास्थळाला भेट देऊन परिस्थिती आटोक्यात आणली.
घटनेचा पुढील तपास काळेपडळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विनायक गुरव करत आहेत.गेल्या अनेक दिवसांपासून हडपसर सासवड मार्ग वाहतुकीसाठी प्रचंड धोकादायक झाला आहे रोज या मार्गावर छोटे-मोठे अपघात होऊन निष्पाप नागरिकांचे बळी जाण्याची मालिका सुरूच आहे. तरी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या मार्गावर सुरक्षेच्या दृष्टीने ठोस उपाय योजना करणे गरजेचे आहे.
सध्या या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असून जागोजागी रस्ता खोदला आहे तसेच मुरूम टाकला आहे रात्रीच्या वेळेला यामुळे अपघात घडत आहेत तरी खोदलेल्या ठिकाणी बॅरिकेट्स ,रेडियम, रिफ्लेक्टर लावणे गरजेचे आहे तसेच सुरक्षा रक्षक व वाहतूक नियमन करण्यासाठी सुरक्षा गार्ड नेमून अपघात होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय थोरात यांनी केली आहे.





