पुणे : कात्रज घाटातील जुन्या बोगद्याजवळ गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात रिक्षाचालकाचा मृत्यू झाला असून तीन प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात सायंकाळी सुमारे 5.25 वाजण्याच्या सुमारास आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. मिळालेल्या माहितीनुसार, एमएच 10 डीटी 2697 क्रमांकाची राज्य परिवहन महामंडळाची बस स्वारगेटहून सांगली जिल्ह्यातील विटा येथे जात होती. त्याच वेळी एमएच 12 जीएस 9695 क्रमांकाची रिक्षा खेड शिवापूरहून स्वारगेटकडे येत होती. कात्रज घाट बोगदा संपल्यानंतर दुसऱ्या वळणावर दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात रिक्षाचालक हनुमंत रमेश हंगरगे (वय 42, रा. बिबवेवाडी) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर रिक्षामधील तीन प्रवासी – राजेश इंगवले (वय 48), दशरथ निरगुडे (वय 43) आणि शहाजी शिवदे (वय 41) – हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींना 108 रुग्णवाहिकेद्वारे तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, बस चालक जालिंदर विष्णु शिंदे (वय 53, रा. खानापूर, जि. सांगली) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. अपघातानंतर दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली. या प्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पुढील तपास आंबेगाव पोलीस करत आहेत.