Pune News | घटस्फोटानंतरही सात वर्षे एकाच छताखाली ; मुलीच्या भविष्यासाठी पुन्हा एकत्र

प्रभात वृत्तसेवा
पुणे – मतभेदामुळे १२ वर्षांपासून सुरू असलेला पती-पत्नीमधील वाद समुपदेशनामध्ये मिटला असून लवकरच १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या मुलीच्या भविष्यासाठी दोघांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला.परस्परविरोधात दाखल केलेले ६ दावेही दोघांनी माघारी घेतले. विशेष म्हणजे दोघांचा घटस्फोट झाला असून, त्यानंतरही सात वर्षे एकाच घरात राहत होते. या काळातही दोघांचे वाद सुरूच होते.
माधव आणि माधवीचा (बदलेली नावे) पारंपारिक कांदा-पोहे पध्दतीने २००५ मध्ये विवाह झाला. २००७ मध्ये मुलगी झाली. माधवी नोकरी करायची तर तो पहिली ते बी.कॉम पर्यंतचे क्लास घ्यायचा. सगळे सुरूळीत असताना मुलगी ५ ते ६ वर्षाची असताना मतभेद निर्माण झाले. २०१३ मध्ये कोर्ट-कचेरी सुरू झाली.पतीसह सासरच्यांनी रॉकेल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार पत्नीने पोलिसात केली. पतीने क्रुर वागणूक देत असल्याच्या कारणाने घटस्फोटासाठी अर्ज केला.
गेल्या १२ वर्षात एकामेकाविरोधात तब्बल ६ दावे दाखल केले. पत्नीच्या आरोपातून तिघांची निर्दोष मुक्तता झाली. पतीचा घटस्फोटाचा अर्ज मंजूर झाला. तिने कौटुंबिक हिंसाचाराच्या दाव्यात पतीच्या घरात राहण्याचा अधिकार कायद्याने मिळविला आहे. दोघात वाद सुरू होते. मात्र, ॲड. सुचित मुंदडा यांनी दोघांचे समुपदेशन केले. मुलगी लवकरच १८ वर्षाची होणार असल्याने वाद मिटवून तिच्या भविष्याचा विचार करा,असे सांगितले. दोघांना ते पटल्याने एकामेकाविरोधातील ६ खटले त्यांनी मागे घतेले.
एकाच घरात बारा वर्षे वाद..
एका तपापासून वाद सुरू आहे. दोघे एकाच घरात राहून न्यायालयीन लढाई लढत आहेत. मुलीच्या भविष्यासाठी तडजोड केल्यानंतर दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेऊन दोघे एकाच गाडीने परत गेले. घटस्फोट झाला असला तरीही कदाचित वाद मिटवून ते पुन्हा एकत्र येऊ शकतात.





