Pune News | रस्त्यावर आली डबल डेकर! झाडांच्या फांद्या आणि केबल्स ठरतायत अडथळा

प्रभात वृत्तसेवा
पुणे – पीएमपीएकडून शहरातील चार प्रमुख मार्गावर इलेक्ट्रिक डबल डेकर बसची चाचणी सुरू आहे. या प्राथमिक चाचणीत रस्त्यावरील झाडांच्या फांद्या, केबल्स याचा अडथळा सोडला, तर बहुतांश ठिकाणी चाचणी यशस्वी झाली. आता प्रत्यक्ष प्रवाशांना घेऊन ही चाचणी घेतल्यानंतर पुढील निर्णय होणार असल्याचे पीएमपी प्रशासनाने स्पष्ट केले.
पुणे शहरात मंगळवारी (दि. १५ सप्टेंबर) २५ ते ३० वर्षानंतर पुन्हा डबल डेकर बस दाखल झाली. मात्र, ही बस वातानूकुलित आणि इलेक्ट्रिक आहे. त्यामुळे प्रवाशांना आरामदायी प्रवास देण्यासाठी ती विशेष आकर्षण ठरेल. पीएमपीएमएलने चाचणीसाठी घेतलेली बस स्वीच कंपनीची असून, आठ ते दहा दिवसांत या बसची चाचणी पूर्ण होईल, असे पीएमपी प्रशासनाने सांगितले.
हिंजवडी फेज ३ ते हिंजवडी फेज ३ (वर्तुळ मार्ग), रामवाडी मेट्रो स्टेशन ते खराडी, मगरपट्टा सीटी ते कल्याणीनगर मेट्रो स्टेशन आणि पुणे स्टेशन ते लोहगाव विमानतळमार्गे विमाननगर अशा चार मार्गांवर पीएमपीचे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ही चाचणी झाली. त्यामध्ये काही मार्गांवर झाडांच्या फांद्या आडव्या येत आहेत. दोन ते तीन ठिकाणी रस्ता अरुंद असल्यामुळे कोंडीत बस वळविताना अडचणी येऊ शकतात, तसेच केबल्सचाही अडथळा येत असल्याचे दिसून आले. त्याबाबत महापालिका विभागाशी चर्चा करून हे अडथळे दूर करण्यात येणार आहे.
प्रवाशांसह होणार चाचणी…
पीएमपीचे अध्यक्ष पंकज देवरे यांच्या उपस्थितीत डबल डेकर बसची कात्रज ते हिंजवडी मार्गावर चाचणी झाली. मागील आठ दिवसांत अन्य मार्गांवरही चाचणी करण्यात आली. त्या वेळी पीएमपीतील तांत्रिक, आयटी सेक्टर यासह विविध विभागांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत चाचणी घेण्यात आली. मात्र, आता प्रत्यक्ष प्रवाशांनाही घेऊन ही चाचणी करण्यात येणार असल्याचे पंकज देवरे यांनी सांगितले.
पहिल्या टप्प्यात १० बस..
चाचणीचा अहवाल संचालक मंडळाच्या बैठकीत मांडल्यानंतर बस खरेदीचा निर्णय घेण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात १० इलेक्ट्रिक डबल डेकर बस घेण्यात येणार आहे. या बसमध्ये ८५ प्रवाशी क्षमता आहे. एकदा बॅटरी चार्ज झाल्यावर जवळपास १५० किमी बस धावते. ही बस पूर्णपणे इलेक्ट्रिक, वातानुकूलित, पर्यावरणपूरक आहे.





