Pune News : आंबेडकर भवनाच्या जागेवरून वाद! राखीव भूखंड बिल्डरला विकल्याने आंबेडकरी संघटना आक्रमक

प्रभात वृत्तसेवा
पुणे – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सांस्कृतिक भवन विस्तारीकरणासाठी आरक्षित असलेली जागा खासगी बांधकाम व्यावसायिक कंपनीला विकल्याच्या विरोधात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक समितीने गुरुवारपासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ बेमुदत जन आक्रोश धरणे आंदोलन सुरू केले आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीतर्फे करण्यात येत असलेल्या या आंदोलनाचे नेतृत्व समितीचे समन्वयक शैलेंद्र मोरे, नीता अडसुळे, दीपक गायकवाड, राजाभाऊ कांबळे यांनी केले आहे.
ही जागा खासगी बांधकाम व्यावसायिक कंपनीस विकण्यास विरोध दर्शवित राज्य सरकारच्या आणि पालिकेच्या निर्णयाचा जाहीर निषेध केला आहे. या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि बांधकाम व्यावसायिक कंपनीमध्ये झालेला करार तात्काळ रद्द करण्यात यावा. मालधक्का चौक येथील ८९०० चौ. मी.
जागेचे राज्य सरकारने तात्काळ हस्तांतरण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरणासाठी करावे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन आरक्षित जागेचे राज्य सरकारने अधिकृतरीत्या भूमिपूजन करावे,अशी मागणी करण्यात आली आहे.





