Pune News | प्रभाग रचना हरकतींसाठी मुदतवाढीची मागणी ; मनसेकडून आयुक्तांना पत्र

प्रभात वृत्तसेवा
पुणे – महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता २२ ऑगस्ट रोजी प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. या रचनेवर नागरिक, विविध संस्था तसेच राजकीय पक्षांच्या सूचना व हरकती नोंदविण्यासाठी महापालिकेकडून ४ सप्टेंबरपर्यंत कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
मात्र, या काळात शहरात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असल्याने अनेकांना आपले म्हणणे मांडणे कठीण जाणार असल्याचे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी ही मागणी महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.
मनसेकडून देण्यात आलेल्या पत्रानुसार, प्रारूप प्रभाग रचना अत्यंत पक्षपाती असून, सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी पुणे शहराचे अक्षरशः लचके तोडण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांचा विश्वास कमी होत असून, त्यांच्या मनातील नाराजी वाढत आहे. नागरिक, संस्था व विविध घटकांना आपले मत मांडण्यासाठी व आवश्यक दुरुस्त्या सुचविण्यासाठी पुरेसा वेळ मिळणे आवश्यक आहे.
गणेशोत्सव हा पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा उत्सव असल्याने या काळात बहुतांश नागरिक, मंडळे व सामाजिक संस्था उत्सवाच्या तयारीत व्यस्त असतात. त्यामुळे प्रभाग रचनेवरील सूचना व हरकती सादर करण्यासाठी दिलेल्या वेळेत अपेक्षित प्रमाणात सहभाग होणार नाही.
ही बाब लक्षात घेता सूचना व हरकती नोंदविण्याची मुदत किमान दोन आठवड्यांनी वाढवावी तसेच या मागणीचा गांभीर्याने विचार करून कालावधी वाढविल्यास पुणेकरांचा व्यापक सहभाग होईल आणि प्रभाग रचनेतील त्रुटी दूर करण्याची संधी मिळेल, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.





