Pune News | मतांची चोरी मुद्दयावर काँग्रेसचा पुण्यात मशाल मोर्चा

प्रभात वृत्तसेवा
पुणे – काँग्रेसचे व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदार यादीत मोठ्या प्रमाणात झालेले घोटाळे उजेडात आणले आहेत. निवडणूक आयोगावर दबाव टाकून मतदार यादीमध्ये घोटाळे करून मतांची चोरी करून भाजपाने गैरमार्गाने सत्ता मिळवल्याचा आरोप करत आज (गुरुवारी) पुणे शहर, जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गोपाळकृष्ण गोखले पुतळा, गुडलक चौक ते ऐतिहासिक फर्गसन कॉलेजचा मुख्य दरवाजापर्यंत मशाल मोर्चा काढण्यात आला.
राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने भाजपाने मतचोरी कशी केली, हे पुराव्यासह मांडून मतदानातील मोठा घोटाळा उघड केला. मात्र, त्यांनी पुराव्यासह तथ्य मांडूनही ना केंद्र सरकारने चौकशी करण्याची धमक दाखवली, ना निवडणूक आयोगाने काही खुलासा केला. निवडणूक आयोगाच्या १९६० च्या नियमावलीनुसार जर अशा प्रकारे कोणी हरकत घेतली वा आक्षेप नोंदवला, तर ताबडतोब चौकशी करावी, असे कायदाच सांगत आहे.
मग चौकशी का केली जात नाही? लवकरात लवकर चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी या मशाल मोर्चाद्वारे करण्यात आली.या वेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, खजिनदार ॲड. अभय छाजेड, भीमराव पाटोळे, माजी नगरसेवक अजित दरेकर, रफिक शेख, सुजाता शेट्टी, लता राजगुरू, मेहबूब नदाफ, राज अंबिके, प्राची दुधाणे, राजेंद्र भुतडा, प्रदीप परदेशी, नितीन परतानी, युवक अध्यक्ष सौरभ अमराळे, राजेंद्र मोहिते यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.





