प्रभात वृत्तसेवा पुणे : पश्चिम पुण्याचे प्रवेशद्वार असलेल्या चांदणी चौक–भूगाव रस्त्यावरील वाहतूक कोंडीतून अखेर पुणेकरांना दिलासा मिळणार आहे. या मार्गावर महापालिका तब्बल २०३ कोटी रुपये खर्चून भुयारी मार्ग तसेच उड्डाणपूल उभारणार आहे. भूगाव आणि भूकूम परिसरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाल्याने या भागातून लाखो वाहने शहरात येतात. तसेच या रस्त्याने हिंजवडी, घोटावडे, पिरंगूट, मुळशी व कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांचीही मोठी संख्या आहे. चांदणी चौकापासून पुढे हा दोन किलोमीटरचा रस्ता अत्यंत अरुंद असल्याने रोज प्रचंड कोंडीचा सामना करावा लागतो. ही कोंडी दूर करण्यासाठी या प्रकल्पास पालिकेच्या अंदाज समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती पालिकेच्या प्रकल्प विभागाचे प्रमुख दिनकर गोजारे यांनी दिली. या प्रकल्पासाठी ७४ टक्के जागा ताब्यात घेण्यात आली असून ८५ टक्के जागा ताब्यात आल्यावर कामाला सुरुवात करण्याचे नियोजन आहे. चांदणी चौकातील काम पूर्ण झाल्यानंतर वाहने वेगाने पुढे सरकतात. मात्र अरुंद रस्ता असल्याने पुढे प्रवाशांना पुन्हा कोंडीत अडकावे लागते. नियमानुसार या रस्त्याची रुंदी ६० मीटर असायला हवी. प्रत्यक्षात ती केवळ १०.३० मीटर आहे. मर्यादित रुंदीमुळे सततची कोंडी आणि अपघाताचे वाढते प्रमाण पाहता हा प्रकल्प राबविण्यात येत असून यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. असा असेल ग्रेड सेपरेटर पीव्हीपीआयटी कॉलेज चौकातील प्रस्तावित ग्रेड सेपरेटर ४३० मीटर लांबीचा असणार असून त्यातील १२० मीटर भाग आरसीसी स्ट्रक्चरचा असेल. २३.२ मीटर रुंदीच्या स्ट्रक्चरसाठी २७ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. बावधनकडे जाणारा रस्ता आणि चांदणी चौकातून पुढे तीव्र उतार असल्यामुळे येथे ग्रेड सेपरेटरची गरज असल्याने त्यानुसार प्रकल्प आखला आहे. असा असेल उड्डाणपूल एम्ब्रोसिया चौक ते पाटीलनगर चौकादरम्यानचा उड्डाणपूल ८७० मीटर लांबीचा असून त्यातील ५४४ मीटर भाग आरसीसीचा असेल. २३.२ मीटर रुंदीच्या या पुलासाठी सुमारे ८२ कोटी रुपये खर्च येणार आहे. हा पूल सुरू झाल्यानंतर चांदणी चौक–भूगावदरम्यानचा प्रवास वेळ लक्षणीय प्रमाणात घटेल. तसेच राम नदीवर ३० मीटर लांबीचा आणि ७० मीटर रुंदीचा पूल उभारण्यात येणार असून नदीपात्र ओलांडताना होणारी कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होण्याची अपेक्षा आहे.