Pune News : आयुक्त घेणार गटनेत्यांची बैठक! अनधिकृत राजकीय होर्डिंग्ज न लावण्याचे करणार आवाहन
Pune News : शहरातील जीवघेण्या अनधिकृत होर्डिंग विरोधात महापालिका आयुक्तांचा कडक पवित्रा; सर्व पक्षांच्या गटनेत्यांची घेणार बैठक.

Pune News – पुणे महापालिका आणि पुणे पोलीसांनी संपूर्ण आठवडाभर शहरातील अनधिकृत फ्लेक्स आणि होर्डिंगवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अशाप्रकारचे अनधिकृत होर्डिंग लागूच नयेत यासाठी गटनेत्यांची बैठक घेणार असल्याचे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.
संपूर्ण शहरात विविध पक्षांच्या नेत्यांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंतचे वाढदिवस, नियुक्ती, निवड, शुभेच्छा, सण समारंभ यांचे अनधिकृत होर्डिंग्ज, मोठ्यापासून छोट्यापर्यंतचे फ्लेक्स लावले जातात. अनेक, खांबांवर पण ते पहायला मिळतात. तसेच हे होर्डिंग आणि फ्लेक्स परवानगी न घेता, चुकीच्या ठिकाणी लावलेले असतात.
काही ठिकाणी ते धोकादायक परिस्थितीत असतात, त्यामुळे वाहनचालक, पादचारी यांना अपघात होतो, जिवावर बेतते. यामुळेच आता शहरातील अनधिकृत फलक, होर्डिंग काढून टाकण्याचा निर्णय पोलीस आणि महापालिका प्रशासनाने संयुक्तरित्या घेतला आहे. सध्या, या गोष्टी काढून टाकल्या जाणार असल्या तरी पुन्हा त्या लागल्यास कायदेशीर कारवाई करत, ते लावणाऱ्यावर थेट गुन्हे दाखल केले जाणार आहेत.
ज्या प्रिंटींग प्रेस मध्ये ते छापले आहे त्यांना आणि ज्यांनी छापले आहे त्यांनाही शोधून काढण्यात येणार असल्याचे, नवल किशोर राम यांनी सांगितले. याशिवाय राजकीय फ्लेक्सची संख्या जास्त असल्याने सगळ्या पक्षांच्या गटनेत्यांची बैठक घेणार आहे. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना असे फ्लेक्स, पोस्टर्स, होर्डिंग लावू नये असे आवाहन करावे, अशी विनंती करण्यात येणार आहे.
तसे पत्रही महापालिका गटनेत्यांना देणार आहे. त्यानंतरही हा प्रकार सुरूच राहिला तर होर्डिंग, फ्लेक्स वगैरेंवर ज्यांची छायाचित्रे आहेत आणि ज्यांनी ते लावले आहे, त्या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.





