Pune News | आयुक्त सुनावणीत ; महापालिकेत शुकशुकाट,अनेक अधिकारी दुपारच्या जेवनानंतर गायब

प्रभात वृत्तसेवा
पुणे – महापालिका आयुक्त गुरूवारी दिवसभर प्रारूप प्रभाग रचनेच्या सुनावणीत असल्याने महापालिकेतील अनेक अधिकाऱ्यांनी गुरूवारी दुपारीच महापालिकेतून काढता पाय घेतला. आयुक्त नसल्याची संधी साधत अनेक अधिकारी साइट व्हीजीटच्या नावाखाली दुपारच्या जेवनानंतर गायब झाल्याने कामांसाठी आलेल्या नागरिकांना माघारी फिरावे लागले.महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेच्या दोन दिवसांच्या सुनावणीचा आज पहिला दिवस होता.
त्यामुळे, महापालिका आयुक्त सकाळीच या सुनावणीसाठी बालगंधर्व रंगमंदीरात पोहचले होते. त्यामुळे ते दिवसभर महापालिकेत येणार नाहीत याची कल्पना अनेक अधिकाऱ्यांना होती. मात्र, दुपारी १२ वाजता महापालिकेत पूर्वगणक समितीची बैठक असल्याने साडे अकरा नंतर बैठकीसाठी अनेक विभाग प्रमुख आले. त्यानंतर ही बैठक संपल्यावर जेवणासाठी बाहेर पडलेले अधिकारी महापालिकेत फिरकलेच नाही.
तर, अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी नागरीक त्यांच्या कार्यालयात गेल्यानंतर त्यांना साहेब साइट व्हिजीटसाठी गेल्याचे सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात अधिकाऱ्यांनी सकाळीच साइट व्हिजीट करून दुपारनंतर कार्यालयात उपस्थित राहणे आवश्यक आहे. मात्र, आता कर्मचाऱ्यांप्रमाणे वरिष्ठ अधिकारी महापालिकेत नसल्याची संधी साधत गायब होत आहेत.





