Pune News | स्वच्छ पुण्याची शपथ! महापालिकेचा पंधरवडा सुरू, काय आहे खास?

प्रभात वृत्तसेवा
पुणे – पुणे महापालिकेतर्फे १७ सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान स्वच्छता पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध उपक्रम राबवले जाणार आहेत, तसेच शहरात स्वच्छतेविषयी जनजागृतीही केली जाणार आहे.या अभियानाचे उद्घाटन आयुक्त नवलकिशोर राम यांच्या हस्ते झाले. या वेळी आमदार हेमंत रासने, अतिरिक्त पृथ्वीराज बी.पी., उपायुक्त माधव जगताप, घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त संदीप कदम, महापालिकेचे स्वच्छता ब्रँड अँबेसिडर सत्या नटराजन, शामला देसाई, विक्रांत सिंग यांच्यासह स्वयंसेवी संस्थांचे, महाविद्यालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्त १७ सप्टेंबरपासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त दोन ऑक्टोबरपर्यंत स्वच्छता पंधरवडा साजरा केला जातो. स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत पंधरवड्याच्या कालावधीत सर्व क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत अस्वच्छ ठिकाणांची स्वच्छता, सार्वजनिक जागांची स्वच्छता, सफाई मित्र सुरक्षा शिबिर, स्वच्छ हरित महोत्सव, स्वच्छता पुरस्कार आदी उपक्रम राबवले जातील. विविध ठिकाणी स्वच्छता मोहिमांचे आयोजन केले जाईल, असे कदम यांनी सांगितले.
हे अभियान सुरुवातीला केवळ शासकीय इमारतींपुरतेच मर्यादित होते. मात्र, हळूहळू त्याचा विस्तार करून ही लोकचळवळ झाली आहे, असे नवल किशोर राम म्हणाले. मराठवाडा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सार्वजनिक स्वच्छतेच्या अनुषंगाने पथनाट्य सादर केले ह्यूमन मॅट्रिक्स संघाने स्वच्छता आणि प्लॅस्टिक बंदीवर पथनाट्य सादर केले. या वेळी स्वच्छतेची शपथ घेण्यात आली आणि मानवी साखळी तयार करून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.





