पुणे : महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेबाबत चर्चांना उधाण आले असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आयुक्तांच्या बंगल्यावर गेले, अशी अफवा शुक्रवारी संध्याकाळी पसरली. यामुळे काही विरोधकांची धावपळ उडाली आणि त्यांनी आपले कार्यकर्ते त्या भागात पाठवले. मात्र, वस्तुस्थिती वेगळीच होती. शुक्रवारी मुख्यमंत्री फडणवीस पुण्यात विविध कार्यक्रमांसाठी आले होते. संध्याकाळी यशदा येथे पुणे महानगर ग्रोथ हबची बैठक आटोपल्यानंतर त्यांचा ताफा गणेशखिंड रस्त्याने कोथरूडकडे निघाला. मात्र, इस्कॉन मंदिराजवळून ताफा मॉडेल कॉलनीकडे वळला. त्याच मार्गावर महापालिका आयुक्तांचा शासकीय निवास असल्याने हा ताफा त्या दिशेने जाताना दिसताच काही कार्यकर्त्यांनी ही माहिती माजी नगरसेवकांपर्यंत पोहोचवली. २०१७ मध्ये प्रभाग रचनेच्या काळात आयुक्तांच्या बंगल्यावर भाजप पदाधिकाऱ्यांची गुप्त भेट झाल्याची पार्श्वभूमी लक्षात घेता, यंदाही तसेच काहीतरी घडतेय, असा समज निर्माण झाला. मात्र, फडणवीस आयुक्तांकडे न जाता मॉडेल कॉलनीतील एका नामवंत उद्योगपतीच्या घरी खासगी भेटीसाठी गेले होते आणि काही वेळ थांबून कोथरूडकडे रवाना झाले.