Pune News : पुण्यात काँग्रेस प्रवक्त्याला मारहाण; राजकीय वर्तुळात मोठी खळबळ
Pune News : पुण्यातील एका वृत्तवाहिनीच्या कार्यालयाबाहेर हनुमंत पवार यांच्यावर तुषार दामगुडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे.

Pune News : पुण्यातील एका वृत्तवाहिनीच्या कार्यालयाबाहेर हनुमंत पवार यांच्यावर मारहाण झाल्याची घटना घडली आहे. डिबेट शोसाठी गेलेल्या पवार यांना तुषार दामगुडे आणि त्याच्या काही सहकाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
हनुमंत पवार यांचा आरोप काय?
पवार यांनी सांगितले की, डिबेटदरम्यान त्यांनी भाजप नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांबाबत झालेल्या कथित अवमानाचा उल्लेख केला. यामुळे काही हिंदुत्ववादी कार्यकर्ते संतप्त झाले. कार्यक्रमानंतर बाहेर पडताच त्यांना धमकावण्यात आले.
कमरेला पिस्तूल असल्याचे दाखवून धमकी देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. “मी अशा धमक्यांना घाबरत नाही असे सांगितल्यानंतर माझ्यावर हल्ला करण्यात आला. छातीवर आणि तोंडावर मार लागला,” असे पवार यांनी म्हटले.
पुणे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही बाजूंमध्ये आधी बाचाबाची झाली. त्यानंतर चार-पाच जणांनी पवार यांना मारहाण केली. तुषार दामगुडे याच्यासह दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत कठोर कारवाईची मागणी केली आहे.
ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही या हल्ल्याचा निषेध करत लोकशाही मूल्यांवर हल्ला असल्याचे म्हटले आहे. “विचारांची लढाई हिंसाचारातून लढली जाऊ नये. दोषींवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, या घटनेमुळे पुण्यातील राजकीय वातावरण तापले असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





