Pune News | शिस्तबद्धपणे गणेशोत्सव साजरा करा ; अमितेश कुमार यांचे आवाहन

प्रभात वृत्तसेवा
पुणे – गणेशोत्सव हा आपला सांस्कृतिक आणि सामाजिक सोहळा आहे. तो उत्साहात, परंतु शिस्तबद्धपणे साजरा व्हावा, यासाठी पोलीस प्रशासन सदैव मंडळांच्या पाठीशी आहे, असे प्रतिपादन पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले.पुणे पोलीस आणि विघ्नहर्ता न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आदर्श गणेशोत्सव स्पर्धा २०२४’ चा पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवारी शिवाजीनगर पोलीस मुख्यालय येथे पार पडला.
यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते विजेत्या मंडळांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, ज्येष्ठ पत्रकार राजीव साबडे, डॉ. मिलिंद भोई, उदय जगताप, अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, मनोज पाटील, पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त ऋषीकेश रावले, मिलिंद मोहिते, संभाजी कदम, सोमय मुंडे, डॉ. राजकुमार शिंदे, वाहतूक शाखेचे उपायुक्त हिंमत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
वाद मिटवून समन्वय साधला..
विसर्जन मिरवणुकीतील सहभागावरून सुरू असलेला वाद पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे मिटल्याचे सांगून अमितेश कुमार म्हणाले, मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून समन्वय साधला आहे. राज्य सरकारने गणेशोत्सवाला राज्यउत्सवाचा दर्जा दिला असून, मंडळांना आवश्यक सर्व परवानग्या एकाच ठिकाणी मिळतील. काही अडचणी आल्यास थेट पोलिसांशी संपर्क साधावा.
सुरक्षेवर भर..
उत्सव काळात मोठ्या प्रमाणावर बाहेरील भाविक येत असल्याने सुरक्षेची व्यापक आखणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मंडळांनी मंडप परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. हे कॅमेरे पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाशी जोडले जातील. तसेच समाजोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या मंडळांचे कौतुक केले जाईल, असेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस उपायुक्त ऋषीकेश रावले यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपायुक्त हिंमत जाधव यांनी केले.





