प्रभात वृत्तसेवा पुणे – प्रभाग क्र.३४ नऱ्हे-वडगाव बुद्रुक येथे मोठ्या प्रमाणात बोगस हरकती दाखल झाल्याचा आरोप करीत या प्रकारात सहभागी झालेल्या कार्यकर्ते व इच्छुकांवर निवडणूक आयोगाने तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी पुणे शहर आम आदमी पक्षाने केली आहे.याबाबत धनंजय बेनकर यांनी राज्य निवडणूक आयोग, जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले. बेनकर म्हणाले की, सत्ताधारी पक्षांच्या इच्छुकांच्या सांगण्यावरून काही कार्यकर्त्यांनी प्रभाग रचनेबाबत नागरिकांच्या नावाने बोगस हरकती दाखल केल्या आहेत. फक्त एका दिवसात म्हणजे ४ सप्टेंबरला तब्बल दीड हजार हरकती अर्ज दाखल झाले.या प्रकारामुळे निवडणूक आयोगाच्या आदेशाची आणि आदर्श आचारसंहितेची पायमल्ली झाली असून लोकशाहीवर घाला घालण्यात आला आहे. बोगस हरकतींमुळे निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा धोक्यात येत असून आयोगालाच वेठीस धरण्याचा प्रयत्न होत आहे. पुण्यातील सर्वाधिक हरकती अर्ज प्रभाग क्रमांक ३४ मध्येच दाखल झाले आहेत. नागरिकांना या अर्जांची माहिती नसून काहीजणांच्या नावाने परस्पर अर्ज दाखल करून बोगस सह्या करण्यात आल्याचा संशय आहे. त्यामुळे तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.