Pune News : वानवडीतील लुल्लानगर भागात लष्कराच्या मोकळ्या जागेत तरुणाचा खून करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. खून झालेल्या तरुणाची ओळख पटलेली नाही. त्यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. वानवडीतील लुल्लानगर भागात लष्कराची विक्रम बात्रा वसाहत आहे. वसाहतीच्या परिसरात केंद्रीय विद्यालय आहे. या भागात लष्कराची मोकळी जागा आहे. मोकळ्या जागेत ३० ते ३५ वर्षांचा तरुण मृतावस्थेत पडल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानंतर वानवडी पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेंद्र करणकोट यांनी घटनास्थळी भेट दिली. तरुणाच्या शरीरावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याचे उघडकीस आले. तरुणाची ओळख पटलेली नसल्याने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस कर्मचारी संदीप वाघ यांनी याबाबत वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट तपास करत आहेत.