Pune News | गणरायाचा आशीर्वाद! पुणे मेट्रोच्या प्रवाशांमध्ये एकाच दिवसात १ लाखांची भर
प्रभात वृत्तसेवा
पुणे – राज्याचा उत्सव असलेल्या गणरायाने पुण्याच्या मेट्रोला आशीर्वाद दिल्याने केवळ एका दिवसात मेट्रोच्या प्रवाशांमध्ये आणि उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. शनिवारी एका दिवसात मेट्रोची प्रवासी संख्या तब्बल लाखाने तर उत्पन्नही १३ लाखांनी वाढले आहे.गणेशोत्सवात पुणेकरांची प्रचंड गर्दी होणार हे लक्षात घेऊन मेट्रोने प्रवाशांसाठी विशेष नियोजन केले आहे.
शनिवार (३० ऑगस्ट) पासून मेट्रो सेवा रात्री २ वाजेपर्यंत सुरू ठेवली असून यामुळे प्रवाशांची संख्या आणि उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. २९ ऑगस्ट रोजी मेट्रोने २ लाख ६० हजार ५३२ प्रवाशांची वाहतूक केली होती. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ३० ऑगस्ट रोजी ही संख्या तब्बल ३ लाख ६८ हजार ५१६ एवढी झाली. म्हणजे एका दिवसात प्रवासी संख्येत तब्बल १ लाखांची वाढ झाली. याचबरोबर मेट्रोचे उत्पन्नही १३ लाखांनी वाढले आहे.
गणेशोत्सवासाठी शहराच्या उपनगरांमधून तसेच राज्याच्या विविध भागातून मोठया प्रमाणात भाविक शहरात येतात. शहरात पार्किंगसाठी असलेली मर्यादीत जागा लक्षात घेऊन मागील वर्षांपासून गणेश भक्त मेट्रोला प्राधान्य देत आहे. त्यातच, या वर्षी कसबापेठ, मंडई स्थानक सुरू झाल्याने थेट मध्यवर्ती पेठांमध्ये नागरिकांना विनाअडथळ जाता येते.
त्यामुळे महामेट्रोकडून ५ सप्टेंबरपर्यंत सकाळी ६ ते रात्री २ या वेळेत मेट्रो सेवा चालू राहणार आहे. ६ सप्टेंबरला (आनंत चतुर्दशी) पुणे मेट्रो सलग ४१ तास प्रवाशांसाठी उपलब्ध राहणार आहे. म्हणजे ६ सप्टेंबर रोजी सकाळी ६ पासून ते ७ सप्टेंबर रात्री ११ पर्यंत मेट्रोची सेवा सुरू असणार आहे. ८ सप्टेंबरपासून सेवा पुन्हा नियमित वेळापत्रकानुसार असेल.
मंडई, कसबा पेठ या मध्यवर्ती भागातील मेट्रो स्थानकांवर प्रवाशांची विशेष गर्दी दिसून आली. मंडई स्थानकावर साधारणपणे १५ हजार प्रवासी दिवसभरात उतरतात. मात्र गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी ही संख्या तब्बल ४० हजारांवर गेली. दुसऱ्या दिवशी २४ हजार प्रवासी येथे नोंदवले गेले. या पार्श्वभूमीवर गर्दी व्यवस्थापनासाठी महामेट्रोने काही उपाययोजना केल्या आहेत.
मंडई स्थानकावर प्रवेश व निर्गमनासाठी वेगवेगळे मार्ग निश्चित केले आहेत. प्रवेश टिळक पुतळ्याजवळून, तर भाजी मंडईकड बाहेर पडण्यासाठी मार्ग देण्यात आला आहे. क्यूआर कोड तिकिट खरेदीसाठी अतिरिक्त सेवा केंद्र उभारले आहे. कसबा पेठ स्थानकातही अतिरिक्त प्रवेशमार्ग खुले करण्यात आले आहेत.
प्रवासी संख्या पाच लाख?
गणेशोत्सवात मेट्रो प्रवाशांची संख्या दैनंदिन ५ लाखांच्या घरात पोहोचेल, असा अंदाज मेट्रोने व्यक्त केला आहे. स्वारगेट–सिव्हिल कोर्ट दरम्यान मेट्रोच्या फेऱ्या सहा मिनिटांनी होत असताना गर्दी लक्षात घेता आता त्या तीन मिनिटांच्या अंतराने होत आहेत. मेट्रोने दिलेल्या सुविधा, विशेष नियोजनामुळे पुणेकरांचा गणेशोत्सव कमी अडथळ्यांत पार पडेल.





