प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिकेत पुन्हा एकहाती सत्ता मिळविण्यासाठी भाजपने कंबर कसली असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पाच माजी नगरसेवकांच्या हातात कमळ दिल्यानंतर आता काँग्रेसचे पाच नगरसेवक भाजपच्या वाटेवर आहेत. पुढील आठवड्याभरात या नगरसेवकांचा भाजपमधे प्रवेश होण्याची शक्यता आहे. त्यासाठी या नगरसेवकांच्या प्रभागात निवडून आलेल्या भाजपच्या माजी नगरसेवकांची समजूत घालण्याचे प्रयत्न पक्षाकडून सुरू आहेत. याशिवाय उपनगरांमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या भागातील काही माजी नगरसेवक, तसेच पदाधिकारीही पक्षात घेण्याच्या हालचाली सुरू असल्याने महाविकास आघाडीला अनेक नवीन उमेदवारांचा शोध घ्यावा लागणार आहे. गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या महापालिका निवडणुका आता डिसेंबर-जानेवारीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवार तयारीला लागले आहेत. राज्यात सत्तेत असलेली महायुती एकत्र येऊन निवडणूक लढवणार, की स्वतंत्र हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र, २०१७ मध्ये महापालिकेत तब्बल ९७ जागा जिंकून एकहाती सत्ता मिळविणाऱ्या भाजपने पुन्हा स्वबळावर सत्तेत येण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. २०१७ च्या निवडणुकीत भाजपने मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील नगरसेवकांना पक्षात घेत मोठे यश मिळविले होते. आता तोच फॉर्म्युला पुन्हा वापरण्याची तयारी आहे. विरोधी पक्षातील काही प्रभावशाली नगरसेवक आणि इच्छुकांना पक्षात सामावून घेण्यासाठी भाजपकडून हालचाली सुरू आहेत. काँग्रेसमधून भाजपच्या वाटेवर असलेल्या माजी नगरसेवकांमध्ये अनेक मोठ्या नावांचा समावेश असून, पक्षसंघटनेत तसेच महापालिकेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मात्र, काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आणि पक्षाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे हे नगरसेवक भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनाही याची कुणकुण असली, तरी त्यांना थांबविण्यासाठी अथवा त्यांची नाराजी दूर करण्यासाठी कोणीही पुढे येत नसल्याचे चित्र आहे.