Pune News : ग्रामीण प्रवाशांसाठी मोठा दिलासा: हात दाखवा, बस थांबवा ; पीएमपीचा नवीन उपक्रम

प्रभात वृत्तसेवा
पुणे – पुणे महानगर परिवहन (पीएमपी) पीएमआरडीएच्या हद्दीत हात दाखवा, बस थांबवा उपक्रम राबविणार आहे. मंगळवार (दि. ७) पासून याची अंमलबजावणी होणार असून ग्रामीण भागात प्रवाशाला हात दाखवून बस थांबवता येईल. प्रवासी संख्येमध्ये वाढ व्हावी म्हणून पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील वाड्या-वस्तीवर राहणाऱ्या नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होईल.
अनेक वर्षांपासून पीएमपीकडून ग्रामीण भागात सेवा दिली जात असली तरी अऩेक ठिकाणी बसथांबे नाहीत. प्रवाशांना बसथांब्यांच्या ठिकाणी उन्हात, पावसात उभे राहावे लागते. तसेच बसथांबे नक्की कुठे आहेत हेही लक्षात येत नाही. नव्या निर्णयामुळे ग्रामीण प्रवाशांनी दिलासा मिळणार आहे. सध्या ग्रामीण भागात पीएमपी १३४ मार्गांवर ५५८ बसद्वारे सेवा देते.


