Pune News | महामंडळ कर्ज योजनांमध्ये मोठा बदल ; जामीनदाराच्या मालमत्तेवरही बोजा

प्रभात वृत्तसेवा
पुणे – विविध महामंडळाच्या स्वंयरोजगाराच्या कर्ज योजनेचा लाभ घेणाऱ्यांबरोबर जामीनदारावर कर्जफेडीची जबाबदारी निश्चित केली आहे. कर्ज परतफेडीसाठी लाभार्थ्यांसह जामिनदाराच्या मालमत्तेवरही बोजा चढविण्यात येणार आहे.अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील दुर्बल घटकांना व्यवसायासाठी अल्पव्याजात कर्ज देवून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याकरिता महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळे कार्यरत आहेत.
ही महामंडळे स्वतःच्या व राष्ट्रीय महामंडळाच्या विविध योजना राबवितात. ही महामंडळे राष्ट्रीय अनुसुचित जाती मागासवर्ग वित्तीय विकास महामंडळ व राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्तीय विकास महामंडळांची अधिकृत वाहिनी म्हणून काम करतात. राष्ट्रीय महामंडळाच्या विविध योजनांतील कर्ज, बीज भांडवल आदी योजना महामंडळे राबवितात. यासाठी राष्ट्रीय महामंडळाकडून राज्य महामंडळांस कर्ज स्वरूपात निधी दिला जातो.
अनुसूचित जातीच्या समाजात शिक्षणाचे प्रमाण कमी असल्यामुळे नोकरदार वर्गाचे प्रमाणही कमी आहे. वितरीत कर्जप्रकरणात कर्जधारकाइतकीच जामीनदारावर कर्जफेडीची जबाबदारी निश्चित होत असल्यामुळे त्रयस्थ समाजातील व्यक्ती जामीनदार होण्यास सहजासहजी तयार होत नाही. तसेच आपल्या मालमत्तेवर बोजा नोंद करण्यास संमती देत नाही. बहुतांश अनुसूचित समाजातील लाभार्थ्यांकडे स्वतःची मालमत्ता नसल्याने वैयक्तिक लाभार्थ्यांच्या मालमत्तेवर बोजा नोंद करण्यात अडचणी निर्माण होतात.
महामंडळांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनेत जामीनदाराबाबत असलेल्या अटीमध्ये सुधारणा करण्याची मागणी अनुसूचित जाती समाजाच्या संघटना तसेच लोकप्रतिनिधी वेळोवेळी करत होते. त्याला शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मान्यता दिली आहे. कर्जाचे मुल्य व परतफेडीची क्षमता लक्षात घेऊन नियमावलीत सुधारणा केली आहे.
दोन लाखांच्या कर्ज योजनेसाठी लाभार्थ्यांच्या स्वतःच्या अथवा एका जामीनदारांच्या स्थावर मालमत्ता, जमीन जुमला, मिळकतीवर बोजा चढविण्यात येणार आहे. दोन ते पाच लाखापर्यंतच्या कर्जाच्या योजनेसाठी एक जामीनदार खासगी क्षेत्रातील नोकरदार अथवा शासकीय अनुदानित संस्था, निमशासकीय, शासकीय नोकरदार असला पाहिजे. त्यांना पगारपत्रक, प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे. यातील जामीनदाराच्या स्थावर मालमत्ता, जमीन जुमला, मिळकत यावर व लाभार्थ्यांच्या स्वतःच्या मालमत्तेवरही बोजा चढविण्यात येणार आहे.





