प्रभात वृत्तसेवा पुणे – भिडे पुलावरील वाहतूक शनिवारपासून (११ ऑक्टोबर) पुन्हा सुरू होणार आहे. सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत पूल वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात येणार असून, रात्री दहानंतर मेट्रो पुलाच्या कामानिमित्त वाहतूक बंद राहील. दिवाळीपूर्वी वाढणाऱ्या गर्दीचा विचार करून वाहतूक विभागाने हा निर्णय घेतला आहे.शहराच्या मध्यवर्ती भागातील बाजारपेठांमध्ये दिवाळीच्या खरेदीसाठी गर्दी होत असताना, भिडे पूल बंद असल्यामुळे लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता, तसेच छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. ही बाब लक्षात घेऊन दिवाळीच्या कालावधीसाठी पूल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.दसरा संपल्यानंतरच बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात ग्राहक खरेदीसाठी येत असल्याने, मागील शनिवारी आणि रविवारी मध्यवर्ती भागात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे गणेशोत्सवाप्रमाणे काही दिवसांसाठी हा पूल तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. गेल्या काही महिन्यांपासून मेट्रोच्या डेक्कन स्थानकाला नारायण पेठेशी जोडणाऱ्या पादचारी पुलाच्या कामामुळे भिडे पूल पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे नारायण पेठ, डेक्कन जिमखाना, शनिवार पेठ आणि आसपासच्या भागातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. नारायण पेठेतून डेक्कनकडे जाण्यासाठी वळसा घालावा लागत होता, तर नदीपात्र मार्गाने ये- जा करणाऱ्या वाहनचालकांनाही अडचणी येत होत्या. त्यातच पूल बंद असल्याने दिवाळीच्या काळात होणारी वाहतूक कोंडी आणखी वाढली होती. या पार्श्वभूमीवर सजग नागरिक मंचाकडून भिडे पूल सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार महापालिका, वाहतूक पोलीस आणि महामेट्रोकडून संयुक्त निर्णय घेऊन हा पूल शनिवार सकाळपासून वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. त्याबाबतचे आदेश वाहतूक पोलिसांकडून जारी करण्यात आले आहेत. “शनिवारपासून भिडे पूल सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत वाहतुकीस खुला राहील. मात्र, मेट्रो पुलाचे उर्वरित काम सुरळीतपणे होण्यासाठी रात्री दहानंतर पूल बंद ठेवण्यात येईल. पुढील आदेश मिळेपर्यंत ही व्यवस्था कायम राहील.” – हिम्मत जाधव, उपायुक्त (वाहतूक शाखा)