प्रभात वृत्तसेवा पुणे – ग्रामीण विकास आणि ग्रामपंचायतींची कार्यक्षमता वाढविण्यासाठी राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना’त पुणे जिल्ह्याने आपला वेगळा ठसा उमटविला आहे. या अभियानाचा प्रचार आणि यशस्वी ग्रामपंचायतींच्या कौतुकासाठी ५ जानेवारी रोजी जिल्ह्यातील गलांडवाडी, काटेवाडी आणि आडाचीवाडी येथे विशेष जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण सुप्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम आणि त्यांची टीम असणार आहे.पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील १,३८७ ग्रामपंचायतींपैकी २८२ पंचायतींनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवला आहे. विशेषतः करवसुली, डिजिटल शाळा, स्वच्छता आणि ई-गव्हर्नन्स या क्षेत्रांत दौंड तालुक्यातील गलांडवाडी, बारामतीतील काटेवाडी आणि पुरंदरमधील आडाचीवाडी यांनी आदर्श कामगिरी केली आहे. याची दखल घेऊन हे कार्यक्रम आयोजित केले आहेत.भाऊ कदम आपल्या विनोदी शैलीतून ग्रामविकासाचे महत्त्व, लोकसहभाग आणि पारदर्शक प्रशासनाचे फायदे सांगतील. या वेळी तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.