Pune News : देशातील सर्वोत्तम! प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापनात पुणे अव्वल ; प्लॅस्टिक विलगीकरणाचे प्रमाण ९८ ते ९९ टक्के

प्रभात वृत्तसेवा
पुणे – केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापनावर करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात पुणे शहर सर्वोत्तम ठरले आहे. देशातील विजयवाडा, शिलाँग, भोपाळ, कलकत्ता, वडोदरा, लखनऊ, पुणे आणि मैसूर या आठ शहरांच्या प्लॅस्टिक कचरा प्रक्रियांवर करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात पुणे अव्वल ठरले आहे. मंडळाच्या आकडेवारीनुसार या आठ शहरांपैकी पुणे हे एकमेव असे शहर आहे, जिथे निर्माण होणाऱ्या कचऱ्यातून प्लॅस्टिक विलगीकरणाचे प्रमाण ९८ ते ९९ टक्के आहे. सरासरी पाहिली असता पुण्यातील संकलन आणि विल्हेवाट केंद्रांत येणाऱ्या एक किलो कचऱ्यामध्ये फक्त ७१ ग्राम प्लॅस्टिक आढळते.
देशाच्या लोकसंख्येसह शहरीकरण वेगाने वाढत आहे. त्यामुळे प्लॅस्टिकचा वापरही वाढत आहे. प्लॅस्टिकचे अनेक फायदे असले, तरी त्याचे जैवविघटन न होणारे स्वरूप आणि खराब कचरा व्यवस्थापन प्रणालीमुळे प्लॅस्टिक अनेकदा महापालिकेच्या घनकचऱ्याचा एक प्रमुख घटक बनते आणि शहरातील कचरा डेपोंमध्ये त्यांचे प्रमाण वाढते. यात फक्त एकदा वापरले जाणारे प्लॅस्टिक मोठे आव्हान निर्माण करत आहे. कचऱ्याच्या उगमस्थानावर अप्रभावी विलगीकरण झाल्याने हे प्लॅस्टिक शेवटी लँडफिलमध्ये जातो आणि त्यामुळे पर्यावरणीय हानी होते. हे टाळता यावे म्हणून कचरा संकलनावेळीच त्याचे विलगीकरण होणे अत्यावश्यक आहे आणि केंद्र सरकारकडून त्यासंबंधीचे निर्देशही देण्यात आले आहेत.
मात्र, सर्व महापालिका या कचरा विलगीकरणात तितक्या यशस्वी ठरताना दिसत नाही. त्यामुळे केंद्र सरकारकडून वेळोवेळी याचे मूल्यांकन केले जाते. त्यानुसार मंडळाकडून हे सर्वेक्षण करण्यात आले. त्यासाठी पुण्यातील कचरा संकलन केंद्रापासून ५६९६ किलो, तर विल्हेवाट केंद्रातून १२६३ किलो कचऱ्याचे नमुने तपासण्यात आले. संकलन केंद्रापासून घेतलेल्या कचऱ्यात ४०८ किलो प्लॅस्टिक कचरा निघला, तर पुण्यात निर्माण होणाऱ्या एकूण कचऱ्यापैकी जो प्लॅस्टिक कचरा काढला जातो, त्यापैकी ९८ ते ९९ टक्के प्लॅस्टिक कचरा पुनर्वापराच्या लायकीचा असतो. सर्वेक्षणात पुण्याच्या कचरा संकलन आणि विलगीकरण प्रक्रियेचे कौतुक करण्यात आले आहे.





