Bajaj Auto : बजाज ऑटो फाउंडेशनतर्फे ‘रुपा राहुल बजाज स्कॉलरशिप फॉर विमेन इन इंजिनिअरिंग’साठी 400 कोटी रुपयांची तरतूद
'रुपा राहुल बजाज स्कॉलरशिप'सारखे उपक्रम भारतासाठी अधिक सक्षम आणि विविधतेने समृद्ध नवकल्पना परिसंस्था उभारण्यास मदत करू शकतात.”

Rupa Rahul Bajaj Scholarship : बजाज ऑटो लिमिटेडचा सीएसआर विभाग असलेल्या बजाज ऑटो फाउंडेशनने आज ‘रुपा राहुल बजाज स्कॉलरशिप फॉर विमेन इन इंजिनिअरिंग’ (आरआरबीएसडब्ल्यूई) या उपक्रमाअंतर्गत महिला अभियंत्यांना सक्षम करण्यासाठी पुढील दहा वर्षांमध्ये 400 कोटी रुपयांची महत्त्वपूर्ण वचनबद्धता जाहीर केली.
भारतातील मूलभूत इंजिनीअरिंग शाखांमधील महिलांसाठीची ‘रुपा राहुल बजाज स्कॉलरशिप फॉर विमेन इन इंजिनिअरिंग’ ही सर्वात मोठी शिष्यवृत्ती योजना गुणवान विद्यार्थिनींसाठी तयार करण्यात आली आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स, इंडस्ट्रियल इन्स्ट्रुमेंटेशन, मेकॅट्रॉनिक्स, रोबोटिक्स आणि संबंधित शाखांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
या योजनेअंतर्गत आयआयटी, एनआयटी, आयआयआयटी तसेच नामांकित शासकीय आणि खासगी विद्यापीठांसह 40 आघाडीच्या अभियांत्रिकी संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना त्यांच्या अभियांत्रिकी शिक्षणाच्या कालावधीत 8 लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.
आर्थिक सहाय्यापलीकडे जाऊन ही शिष्यवृत्ती योजना अभियांत्रिकी क्षेत्रातील पुढील पिढीतील महिला नेतृत्व घडवण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आली आहे. यामध्ये संरचित मार्गदर्शन (मेंटॉरशिप), नेतृत्व विकास, उद्योग क्षेत्राचा प्रत्यक्ष अनुभव आणि व्यावसायिक नेटवर्कशी जोडण्याच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
पुण्यातील बजाज ऑटो लिमिटेडच्या मुख्यालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी फाउंडेशनने शिष्यवृत्ती योजनेचे अधिकृत स्वरूप सादर केले तसेच शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या 506 गुणवान विद्यार्थिनींचा गौरव केला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून बायोकॉन लिमिटेडच्या कार्यकारी अध्यक्षा आणि संस्थापक किरण मजूमदार-शॉ उपस्थित होत्या. तसेच बजाज ऑटो लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
प्रगत मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र, डीप टेक्नॉलॉजी आणि औद्योगिक नवकल्पना या भारताच्या आर्थिक वाढीसाठी आणि जागतिक स्पर्धात्मकतेसाठी अधिकाधिक महत्त्वाच्या ठरत असताना, मूलभूत इंजिनिअरिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रांमधील महिलांचे कमी प्रतिनिधित्व दूर करण्याचा या शिष्यवृत्ती योजनेचा प्रयत्न आहे.
कौशल्य विकास, शिक्षण आणि संधी निर्माण करण्याच्या माध्यमातून भारताची भावी कार्यशक्ती घडवण्याच्या व्यापक उद्दिष्टाचा भाग म्हणून या कार्यक्रमात बजाज ऑटो फाउंडेशनचे “व्हेअर देअर इज अ स्कील, देअर इज अ वे” हे ब्रीदवाक्यदेखील सादर करण्यात आले.
यावेळी बोलताना बजाज ऑटो लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज म्हणाले, “संयम, सहानुभूती आणि चिकाटी हे गुण महिलांमध्ये उपजतच असतात. मूलभूत इंजिनिअरिंग क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी हे गुण अत्यंत महत्त्वाचे आहेत. आम्ही हे बऱ्याच वर्षांपूर्वी ओळखले आणि महिला इंजिनीअरना आमच्या मनुष्यबळात सहभागी करून घेतले. सुमारे दशकभरापूर्वी आमच्या मॅन्युफॅक्चरिंग आणि कार्यप्रणालीमध्ये महिलांची उपस्थिती जवळपास नव्हतीच.
आज मात्र आमच्या एकूण मनुष्यबळापैकी महिलांचे प्रमाण जवळपास 20 टक्के इतके आहे. यामुळे आमच्या कामकाजाच्या पद्धतीत अर्थपूर्ण बदल घडून आला असून बजाज ऑटोच्या जागतिक विस्तारातही त्याचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यामुळेच ‘जगातील लोकप्रिय भारतीय’ ही आमची ओळख अधिक बळकट झाली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आमचा हा अनुभव व्यापक उत्पादन क्षेत्रापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे.
रुपा राहुल बजाज स्कॉलरशिप फॉर विमेन इन इंजिनिअरिंग’ ही माझ्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याची योजना आहे, कारण या योजनेला माझ्या प्रिय आईचे म्हणजे रुपा राहुल बजाज यांचे नाव देण्यात आले आहे. शिक्षणाबद्दलची त्यांची निष्ठा आणि महिलांमध्ये त्यांच्या समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याची क्षमता आहे, हा त्यांचा दृढ विश्वास या योजनेसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
‘रुपा राहुल बजाज स्कॉलरशिप’ही शिष्यवृत्ती म्हणजे प्रतिभा, महत्त्वाकांक्षा आणि योग्य संधी मिळाल्यास असामान्य क्षमता फुलू शकते या विश्वासामध्ये केलेली गुंतवणूक आहे. इंजिनीअरिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राच्या भविष्यात महिलांची भूमिका अधिक प्रभावी आणि व्यापक व्हावी यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
या घोषणेच्या परिणामांबाबत आपले विचार व्यक्त करताना बायोकॉन लिमिटेडच्या कार्यकारी अध्यक्षा किरण मजूमदार-शॉ म्हणाल्या, “विज्ञान, इंजिनीअरिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचे भवितव्य सर्वसमावेशकता आणि समान संधी या तत्त्वांवर उभारले गेले पाहिजे.
अधिकाधिक महिलांनी मूलभूत इंजिनिअरिंगच्या शाखांमध्ये शिक्षण घेण्यासाठी पुढे येणे ही केवळ सामाजिक गरज नाही, तर आर्थिकदृष्ट्याही महत्त्वाची आवश्यकता आहे. ‘रुपा राहुल बजाज स्कॉलरशिप’सारखे उपक्रम भारतासाठी अधिक सक्षम आणि विविधतेने समृद्ध नवकल्पना परिसंस्था उभारण्यास मदत करू शकतात.”








