Pune News: एल थ्री बारमध्ये ड्रग सेवन करणार्या तरूणास जामीन

पुणे : जंगली महाराज रस्त्यावरील लिक्विड लीजर लाउंज (एल थ्री) बार मधील ड्रग्ज पार्टी प्रकरणातील व्हायरल व्हिडीओत ड्रगचे सेवन करणार्या करण राजेंद्र मिश्रा यास सत्र न्यायाधीश जे. जी. डोरले यांच्या न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्याने अॅड. अमेय बलकवडे यांमार्फत जामिनासाठी अर्ज केला.
मिश्रा याचे नाव एफआयआरमध्ये नाही. त्याकडून कोणत्याही प्रकारचे ड्रग हस्तगत करण्यात आले नाही. त्याविरोधात यापुर्वी कोणताही गुन्हा नाही. तो एका खाजगी कंपनीमध्ये अभियंता असून तो पुण्याचा रहिवासी असल्याचा युक्तिवाद अॅड. बलकवडे यांनी केला.
त्यांना अॅड. मयूर मराठे, अॅड ऋषिकेश कडू, अॅड. रोहित गुजर, अॅड. सुरज शिंदे यांनी सहकार्य केले. न्यायालयाने सरकार पक्षासह बचावपक्षाचा युक्तिवाद ऐकून घेत विविध अटी शर्तींवर जामीन मंजूर केला.
एलथ्री बारच्या टॉयलेटमध्ये ड्रगसेवन करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी मिश्रा याला अटक केली होती. प्राथमिक चौकशीदरम्यान त्याने ड्रगचे सेवन केल्याची कबुली दिली होती. त्यानंतर, याप्रकरणात 15 जणांविरोधात अटकेची कारवाई करण्यात आली.





