पुणे – उच्च न्यायालयात धाव घेताच बलात्कार प्रकरणातील पीडितेला न्याय मिळाला आहे. अलंकार पोलिसांनी बलात्कार, फसवणूकसह विविध कलमांनी झिरो एफआयआर दाखल केली. फेब्रुवारी २०२४ मध्ये तिने गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज केला होता. २९ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला आहे. तिने अॅड. योगेश आहेर, अॅड अमोल रायकर यांच्यामार्फत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ती कला केंद्रातील कलाकार आहे. २०१७ मध्ये ती वाई तालुक्यातील वेळे येथे काम करताना तिची व आरोपीची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमसंबंधात झाले. त्याने लग्नाच्या अमिषाने वेळोवेळी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. काही काळ तिला पुण्यात घेऊन आला. घरच्यांनाही भेटवले. नंतर मूळगावी जाऊन तिला भेटत असे. यातून ती गरोदर राहिली. घरच्यांनी लग्नाआधी मूल नको ठेवायला म्हटल्याने तिचा पुण्यात गर्भपात केला. ती दुसऱ्यांदा गर्भवती राहिली. त्यावेळीही तिचा गर्भपात केला. त्यानंतर नावावर फ्लॅट घ्यायचे आहे म्हणून २० लाख रुपये घेऊन तिची फसवणूक केली. त्यानतर फ्लॅटचे खरेदी खत गहाण ठेवून तिची फसवणूक केली. फेब्रुवारी २०२४ मध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, गुन्हा हद्दीत येत नसल्याचे कारण सांगत पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. उच्च न्यायालयात प्रकरण जाताच पोलिसांनी झिरो एफआयआर दाखल केली. – अॅड. योगेश आहेर, पीडितेचे वकील काय आहे झिरो एफआयआर ? घटना घडलेल्या ठिकाणच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हा नोंदविला जातो. मात्र, काही कारणास्तव पीडित, फिर्यादी दुसऱ्या पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर तेथे गुन्हा नोंदविला जातो. तेथून संबंधित पोलीस स्टेशनला एफ आय आर पाठविली जाते. त्याला झिरो एफआयआर म्हणतात.