pune news : आंबेगाव पोलीस स्टेशनला ISO 9001:2015 मानांकन; प्रथमच पोलीस ठाण्याला ही मान्यता

pune news – पुणे पोलीस आयुक्तालयातील आंबेगाव पोलीस स्टेशनने एक ऐतिहासिक टप्पा गाठत ISO 9001:2015 मानांकन प्राप्त केले असून, ही सन्माननीय मान्यता मिळवणारे पुणे शहरातील पहिले पोलीस ठाणे ठरले आहे. आज या प्रमाणपत्राचे वितरण मा. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते करण्यात आले.
या यशाचे श्रेय आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने व त्यांच्या सहकाऱ्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीला जाते. या मानांकनामुळे पोलीस स्टेशनमधील सर्व अभिलेख, फाईल्स व रजिस्टर अद्ययावत ठेवले जात असून, कामकाज अधिक सुसूत्र व कार्यक्षम झाले आहे. त्यामुळे नागरिकांना अधिक दर्जेदार व जलद पोलीस सेवा मिळण्यास सुरुवात झाली आहे.
ISO प्रमाणपत्रामुळे पोलिसांमध्ये कामाबद्दल नवचैतन्य व प्रेरणा निर्माण झाली असून, कामाचा ताणही काही अंशी कमी झाल्याचे निरीक्षक झिने यांनी सांगितले.
या प्रसंगी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त संजय बनसोडे, पोलीस उपआयुक्त स्मार्तना पाटील, सहा. पोलीस आयुक्त राहुल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गजानन चोरमले आणि इतर अधिकारी उपस्थित होते.





