Pune News | अजित पवार, मोहोळ, पाटील समोरासमोर, पण संवाद नाही ; राजकारणात नव्या फटक्यांची चाहूल

प्रभात वृत्तसेवा
पुणे – अवघ्या काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी पुण्यातील स्थानिक पदाधिकाऱ्यांबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्याचे पडसाद शहराच्या मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीत उमटले.पालकमंत्री म्हणून अजित पवार, खासदार मुरलीधर मोहोळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील हे तिघेही एकत्र आले होते. मात्र, एकमेकांना नमस्कार केल्यानंतर त्यांनी कोणताही संवाद साधला नाही.
जवळपास २० मिनिटे हे सर्व नेते एकत्र असतानाही संवाद टाळण्यात आला. दरवर्षीप्रमाणे आयोजित अल्पोपहाराच्या कार्यक्रमाला फक्त अजित पवार हजर राहिले तर मोहोळ आणि पाटील यांनी हजेरी लावली नाही. त्यामुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे.पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीची सुरूवात मंडईतील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आणि कसबा गणपतीला पुष्पहार घालून होते.
त्यानंतर काका हलवाई यांच्या वतीने अल्पोपहाराचे आयोजन केले जाते. येथे राजकीय नेते, पत्रकार व मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी होतात आणि नेत्यांमधील अनौपचारिक गप्पा रंगतात. मात्र, यंदा ही परंपरा खंडीत झाल्याचे दिसले.मानाच्या गणपतींचे दर्शन घेतल्यानंतर अजित पवार या कार्यक्रमाला पोहोचले. त्याआधी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, माजी आमदार मोहन जोशी, उल्हास पवार उपस्थित होते.
काही वेळाने मंत्री चंद्रकांत पाटील आले. केंद्रिय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मात्र हा स्नेहमेळावा टाळला. यामुळे या वर्षीची राजकीय मैफिल काही विशेष रंगली नाही. मात्र, मानाच्या गणपतींचे दर्शन घेताना गुलालाने माखल्याने मोहोळ या स्नेहमेळाला आले नसल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. मात्र, प्रत्याक्षात या ठिकाणी या सर्व नेत्यांचा वावर एकमेकांपासून फूटभर लांबूनच असल्याने काहीतरी घडल्याचा भास स्पष्ट जानवत होता.





