Pune News: विमानतळाचा रस्ता की ‘भारत मंडपम’ प्लॅन? स्थायी समिती अध्यक्षांच्या मूकहास्यात दडलंय काय
Pune News: लोहगाव विमानतळ विस्तारीकरणासाठी १४ हजार चौ. मी. जागेच्या भूसंपादनाला स्थायी समितीची मंजुरी; सुमारे ३० कोटी ८३ लाखांच्या निधीला मान्यता.

Pune News – लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेल्या ३० मी. रुंदीच्या पर्यायी रस्त्यासाठी सुमारे १४ हजार ६२९.७६ चौ. मी. जागेचे भूसंपादनाच्या प्रस्तावाला महापालिका स्थायी समितीने गुरूवारी मंजुरी दिली असली तरी लोहगाव विमानतळाशेजारी होणाऱ्या भारत मंडपम या भाजपच्या नियोजित महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठीच हा रस्ता केला जात असल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू झाली आहे,
यासाठीच हा रस्ता करणार आहे का, असे स्थायी समिती अध्यक्षांना विचारले असता त्यांनी हसून मूकहास्यकरीत दुजोरा दिला. भारतीय हवाई दलामार्फत लोहगाव विमानतळाचे विस्तारीकरण आणि आधुनिकीकरणाचे काम सुरू आहे. या प्रकल्पामुळे विमानतळाकडे जाणारा संरक्षण दलाच्या हद्दीतील सध्याचा १२ मी. रुंदीचा प्रवेशमार्ग बंद होणार आहे. त्यामुळे पर्यायी ३० मी. रुंदीचा रस्ता विकसित करणे आवश्यक असल्याचे महापालिका प्रशासनाने प्रस्तावात नमूद केले आहे.
सध्या ५०९ चौकाकडून विमानतळाच्या प्रवेशद्वाराकडे जाणारा रस्ता संरक्षण दलाच्या हद्दीतून जातो. मात्र, विस्तारीकरणानंतर हा मार्ग वापरासाठी उपलब्ध राहणार नसल्याने पर्यायी मार्गाची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यानुसार मुख्य सभेने १८ फेब्रुवारी २०२० मध्ये ३० मी. रुंदीच्या नवीन रस्त्याची आखणी मंजूर केली होती. त्यानंतर राज्य सरकारने विकास आराखड्यात आवश्यक फेरबदल करून या रस्त्याला अंतिम मान्यता दिली. प्रत्यक्षात हे फेरबदल भारत मंडपम साठी झाल्याचीही जोरदार चर्चा सुरू आहे.
“नवीन भूसंपादन कायदा, २०१३ अंतर्गत ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या भूसंपादनासाठी सुमारे ३० कोटी ८३ लाख ९५ हजार ३४१ रुपयांची तरतूद आवश्यक असल्याचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला होता. या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.”
– श्रीनाथ भिमाले, अध्यक्ष, स्थायी समिती





