Pune News | व्हीआयपी’ स्वच्छतागृहांमधून एसी वगळला ; महापालिकेचा खर्चकपातीचा निर्णय

प्रभात वृत्तसेवा
पुणे – शहराच्या प्रवेशद्वारांवर कोट्यवधी खर्च करून उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक स्वच्छतागृहांतील वातानुकूलित (एसी) यंत्रणा वगळण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. एसी बसवल्यास त्याच्या देखभाल व दुरुस्तीचा अतिरिक्त खर्च येणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. दुसरीकडे शहरातील स्वच्छतागृहांची दुरावस्था झालेली असून त्या ठिकाणी साधे पाणीही नाही.
अशा वेळी ती स्वच्छतागृहे चांगली करण्याऐवजी स्वच्छतागृहांसाठी हा अनाठायी खर्च कशाला असा सवाल शहरातील स्वयंसेवी संस्था तसेच विरोधा पक्षांनी उपस्थित करत पालिकेच्या कारभारावर टिका केली आहे. त्यामुळे, प्रशासनाने स्वच्छतागृहांतून एसी वगळल्याची चर्चा आहे.दररोज हजारो नागरिक नोकरी, व्यवसाय वा अन्य कारणांसाठी शहरात येतात. सध्या पालिकेची अनेक ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहे असली, तरी त्यांची स्वच्छता समाधानकारक पद्धतीने होत नसल्याने त्यांचा वापर कमी होतो.
गेल्या वर्षी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहराच्या प्रवेशद्वारांजवळ व महत्त्वाच्या ठिकाणी अद्ययावत ‘व्हीआयपी’ स्वच्छतागृहे उभारण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात साडेचार कोटींची तरतूद केली. यातील पहिले स्वच्छतागृह बाणेर-बालेवाडीत उभारले जात असून, सहा महिन्यांत ते पूर्ण होणार आहे. तेथे वायफाय, मोबाइल व लॅपटॉप चार्जिंग सुविधा, आंघोळीची सोय, कपडे बदलण्याची खोली, दिव्यांगांसाठी रॅम्प अशा सुविधा असतील. नागरिकांना ठराविक शुल्क भरून याचा वापर करता येणार आहे
देखभाल दुरूस्तीची कोंडी ?
स्वच्छतागृहांच्या देखभाल व संचालनासाठी तीन पर्यायांचा विचार केला जात आहे. खासगी संस्थांकडून उभारणी झाल्यास जाहिरात हक्क देऊन खर्च भागवणे, केअर टेकर मार्फत चालविण्यास देणे किंवा पालिकेने स्वत:च संचलन करणे हे पर्याय प्रशासनाने समोर ठेवले आहेत. संबंधित परिसरातील प्रतिसादानुसार या पर्यायांवर निर्णय घेण्यात येणार आहे. याशिवाय स्वच्छतागृहांच्या परिसरात लॉन तयार करून कॅफेटेरिया सुरू करता येईल का, याचीही चाचपणी सुरू असल्याचे पृथ्वीराज बी. पी. यांनी स्पष्ट केले. या ‘कॅफेटेरिया’साठी मिळणाऱ्या भाडयाच्या रकमेतून देखभाल दुरूस्तीचा खर्च उभा करण्याचे पालिकेचे नियोजन आहे.





