पुणे : फुगीर भरती’तलं ‘गुपीत’ काय?

सिंहगडरस्ता –पुणे शहरालगतची गावे महानगरपालिकेत समाविष्ट करण्याची प्रक्रिया लांबल्याने या कालावधीत ग्रामपंचायत कार्यालयात कर्मचाऱ्यांची “फुगीर भरती’ तसेच विकासकामांतील अपहार आणि संबंधीतांवर कारवाई, याबाबत प्रशासनाकडून अद्यापही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने या प्रकरणांतील “गुपीत’ वाढत चालल्याची चर्चा समाविष्ट गावांतील नागरिकांत आहे.
पुणे शहरालगतची 23 गावे नव्याने पालिकेत घेण्याची प्रक्रिया सुरू होताच या गावांतील ग्रामपंचायतीमध्ये कर्मचारी भरती करण्यात आली. हेच कर्मचारी पालिका प्रशासनाकडून “कायम’ केले जातील, अशी अपेक्षा असताना कर्मचाऱ्यांच्या वाढत्या संख्येबाबत आक्षेप नोंदविण्यात आल्यानंतर आयुक्तांनी याकामी समिती नेमली होती. यामध्ये समाविष्ट असलेल्यांचे दाबे दणाणले होते. ग्रामपंचायत दफ्तर महापालिकेच्या ताब्यात आसल्याने त्यानुसार चौकशी अंती या प्रकरणी अहवालही सादर झालेला आहे. गावातील स्वच्छता आणि इतर कामांसाठी ग्रामपंचायतींने वेळोवेळी ठराव करून किंवा अन्य मार्गाने नोकर भरती केल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. मात्र, या संदर्भात ठोस कारवाई झालेली नाही. ती का रेंगाळली? याबाबत संबंधीत गावात चर्चा सुरू आहे.
दरम्यान, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या निधीतून झालेल्या विकासकामांतही अनियमीतता आढळून आल्याने यातून बरेचसे गैरप्रकार झाल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. अनेक गावांतील नागरिकांनी विकासकामांबाबत झालेल्या अपहाराबाबत पुराव्यासह संबंधित खात्यांकडे तक्रारी केलेल्या आहेत. याबाबत कारवाई का होत नाही, अशी कुजबुज संबंधीत गावांत सुरू आहे.
गावे समाविष्ट झाल्यानंतर कामांत अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी आम्ही संबंधित अधिकाऱ्यांसह आयुक्तांकडे केल्या आहेत. जे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक दोषी असतील त्यांच्यावर कारवाईची मागणी आम्ही केली आहे.
– हरेश गुलाब मंडले, उपसरपंच, किरकिटवाडी
अशा प्रकारच्या खूप तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. काही कर्मचारी निलंबितही झाले आहेत. खातेनिहाय चौकशी होऊन जे कर्मचारी दोषी आढळतील त्यांच्यावर वेतनवाढ रोखणे, बढती रोखणे अशी कारवाई होऊ शकते.
– प्रशांत शिर्के, गटविकास अधिकारी
जर एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याने अपहार केला असेल आणि त्याबाबत संबंधीत खात्यातील अधिकाऱ्यांनी अहवाल दिला तर पोलीस दोषी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करू शकतात. अपहार करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यावर पोलीस थेट गुन्हा दाखल करू शकत नाहीत.
– सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक, हवेली पोलीस स्टेशन





