Pune : अधिकारी गायब; नागरिकांचा ठिय्या

येरवडा –येरवडा क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी जागेवरच नसल्याने अशा कारभाराबाबत नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. अधिकारी दोन-दोन महिने भेटत नसल्याने “आई प्रतिष्ठाण’चे पदाधिकाऱ्यांनी तसेच नागरिकांनी क्षेत्रीय कार्यालयात ठिय्या मारला.
येरवडा क्षेत्रीय कार्यालयाचा कारभार सध्या प्रभारी अधिकारी पाहत आहेत. आहे. या इमारतीमध्ये रेशनिंग, परीमंडळ चार आणि क्षेत्रीय कार्यालयाचे दोन मजल्यावर कार्यालय आहे. प्रभाग क्र. 1,2,6चे कामकाज या कार्यालयातून चालते. यामुळे नागरिकांची दररोज मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मात्र, क्षेत्रीय अधिकारी वेळेवर भेटत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत, यातून संताप व्यक्त केला जात आहे.
अधिकाऱ्यांवर अधिकचा भार…
क्षेत्रीय कार्यालयातील दुसरे उपअभियंता महेंद्र बहिरम यांच्याकडे येरवडा आणि सिंहगड क्षेत्रीय कार्यालय अशा दोन कार्यालयांचा भार आहे. त्यामुळे दोन्ही कार्यालयात त्यांना उपस्थित राहावे लागते. सहाय्यक आयुक्त वैभव कडलख यांच्याकडे फक्त क्षेत्रीय कार्यालयाचीच जबाबदारी द्यावी, मिळकत कराचा कार्यभार कमी करावा, अशी मागणी विविध पक्ष संघटना तसेच नागरिक करीत आहेत.
भारतनगर ते पंचशीलनगर या भागातील नागरी समस्यासाठी मागील सहा महिन्यांपासून क्षेत्रीय अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी येत आहोत. मात्र, ते कार्यालयात उपलब्ध नसतात, त्यांच्याकडे तीन विभागाचा कार्यभार आहे. येरवड्यासारख्या संवेदनशील भागासाठी स्वतंत्र अधिकारी द्यावा.
– यश चव्हाण, पदाधिकारी, “आई प्रतिष्ठान’
मिळकतकर विभागाची जबाबदारीही आहे. सध्या मिळकतकराच्या अभय योजनेचे काम सुरू असल्याने क्षेत्रीय कार्यालयास कमी वेळ देता येतो. तसेच, कार्यालयात उपअभियंत्याचे दोन पदे आहेत, त्यातील एक सेवानिवृत झाले असून त्यांचे पद रिकामे आहे. यामुळे प्रशाकीय कामाचा ताण वाढतो आहे.
– वैभव कडलख, सहाय्यक आयुक्त, क्षेत्रीय कार्यालय





