पुणे : जलपर्णी काढणे अखेर सुरू

पुणे – राजाराम पूल परिसरातील नदीपात्रात जलपर्णी वाढली होती. अखेर ती काढण्याचे काम महापालिका प्रशासनाने हाती घेतले आहे. जलपर्णीमुळे नदीकाठ परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही बाब दैनिक “प्रभात’ने समोर आणली होती. त्यानंतर प्रशासनाने हे काम हाती घेतले आहे.
गेल्या काही दिवसांपासून नदीपात्रातील जलपर्णीचा प्रश्न गंभीर बनला आहे. पावसाळ्यापूर्वी ही जलपर्णी काढण्यासाठी महापालिकेने तब्बल 1 कोटींची निविदा काढली असली, तरी प्रत्यक्षात अद्याप कोणतेही काम सुरू केलेले नाही. त्यामुळे मुठा नदीत सर्वत्र जलपर्णी फोफावली आहे. ही बाब समोर आल्यानंतर या कामाची जबाबदारी असलेल्या पालिकेच्या मलनि:सारण विभागाकडून ठेकेदरांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ही बाब गंभीर असल्याने अतिरिक्त आयुक्तांनी संबंधित विभाग प्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावली. यानंतर जलपर्णी काढण्याचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र, राजाराम पुलाशेजारी आर्ट गॅलरी बांधण्यात येत आहे.
या कामासाठी संबंधित ठेकेदाराने नदीपात्रात बांध घातला आहे. त्यामुळे नदीचे पाणी अडवले जात आहे. त्यामुळे जलपर्णी फोफावली आहे. याबाबत माजी नगरसेवक, नागरिकांनी तक्रारी केल्या. यानंतर अखेर हे जलपर्णी काढण्याचे काम बुधवारी सकाळपासून हाती घेण्यात आले आहे.





