पुणे : विमान उड्डाणे पूर्ववत

पुणे- करोनामुळे मागील दोन वर्षे विमानसेवेला मोठ्या प्रमाणावर फटका बसला होता. आता प्रवासी संख्या आणि विमान उड्डाणे पूर्वपदावर येत आहेत. मार्च महिन्यात पुणे विमानतळाहून 4 हजार 140 विमानांचे उड्डाण झाले असून, 5 लाख 59 हजार 396 नागरिकांनी प्रवास केला आहे.
करोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्च 2020 पासून विमानसेवा खंडीत झाली होती. अनलॉकमध्ये टप्प्याटप्प्याने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवेला परवानगी देण्यात आली. मात्र तरीदेखील करोना प्रतिबंधात्मक निर्बंधांमुळे प्रवासी संख्येत वाढ झाली नव्हती. तर यादरम्यान, पुणे विमानतळावरदेखील केवळ सकाळी 8 ते रात्री 8 या वेळात विमानांची ये-जा सुरू होती. त्यामुळे नेहमीच्या तुलनेत सुमारे 50 टक्क्यांनी विमान वाहतुकीत घट झाली होती. आता पुन्हा विमान प्रवाशांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.
जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीत मार्च महिन्यात प्रवासी संख्येत 2 लाखांनी वाढ झाली असून, या कालावधीतील हा उच्चांकी आकडा आहे, अशी माहिती भारतीय विमानतळ प्राधिकरणाने दिली. तर एप्रिलमध्येदेखील प्रवासी संख्या वाढण्याची शक्यता आहे. “समर शेड्युल’ची भर पडण्याने एप्रिल महिन्यातील विमान उड्डाणांची संख्या 70 ते 80 च्या घरात पोहोचली आहे.





