प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिका क्षेत्रांमध्ये जुनी सदनिका घेताना त्यावरील महापालिकेची मालमत्ता कराची (प्रॉपर्टी टॅक्स) थकबाकी असल्यास दस्त नोंदणी करताना त्याची माहिती आता मिळणार आहे. त्यामुळे खरेदीदाराची होणारी संभाव्य फसवणूक कळणार आहे. थकबाकी दस्त नोंदणी करतानाच या कराची थकबाकी भरण्यास महापालिकांनाही विनासायास थकबाकीची रक्कम मिळणार आहे. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने राज्यातील पुणे, पिंपरी-चिंचवड पालिकेसह 28 पालिकांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे, अशी माहिती नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.शहरांमध्ये सध्या नव्या सदनिकांचे दर जास्त असल्याने काही ग्राहक जुन्या सदनिका खरेदी करताना दिसतात. मात्र, या सदनिकांवर महापालिकेच्या मालमत्ता तसेच अन्य करांची थकबाकी असते. संबंधित घरमालक ही थकबाकी जाणीवपूर्वक लपवितो. त्यामुळे खरेदीदार मालमत्ता कर पावती नावावर करण्यासाठी महापालिकेत गेल्यानंतर त्याला थकबाकी भरल्यानंतरच मालकी हक्कात बदल केला जाईल, असे सांगितले जाते. विक्री करणाऱ्याने ही बाब लपविल्याने संबंधित खरेदीदाराला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. त्याचा खरेदीदाराला मनस्तापही होतो. त्यामुळे महापालिकेची असलेली करांची थकबाकी ऑनलाइन दिसावी, अशी प्रणाली तयार करण्याचे काम नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून सुरू होते. सुरुवातीला २०१६ मध्ये पुणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात खरेदी होणाऱ्या जुन्या सदनिकांच्या दस्त नोंदणी वेळी कराची माहिती उपलब्ध करण्याचा प्रयोग केला होता. अन्य शहरांमध्ये ही सुविधा उपलब्ध नव्हती. त्यानुसार आता नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाने दस्त नोंदणीच्या आय सरिता या पोर्टलवर आता ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेत आता दस्त नोंदणी करताना संबंधित सदनिकेचा मालमत्ता कर क्रमांक टाकल्यास त्यावरील महापालिकेचे कर तसेच मालमत्ता कर याची माहिती मिळते. थकबाकी असल्यास ती भरण्याची सुविधादेखील याच पोर्टलवर उपलब्ध करून दिली आहे. थकबाकी भरल्यानंतर त्याचवेळी महापालिकेच्या संकेतस्थळावर संबंधित सदनिकेची थकबाकी जमा झाल्याचा मेसेजदेखील मिळणार आहे. महाराष्ट्र नोंदणी व मुद्रांक शुल्क कायद्यानुसार दस्त खरेदी करताना थकबाकी भरणे बंधनकारक नाही. त्यामुळे नवीन सुविधेत थकबाकी भरायची किंवा नाही याचा पर्यायदेखील ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र, महापालिकेचे मालमत्ता कर पत्रक नावावर करण्यासाठी थकबाकी भरावीच लागणार आहे.