Pune News | RTO मध्ये मोठा अनर्थ टळला ; जुना वृक्ष कोसळला…वाहनांचे नुकसान,एक जण जखमी

प्रभात वृत्तसेवा
पुणे – प्रादेशिव परिवहन कार्यालय, पुणे (आरटीओ) येथील परिसरात सायंकाळी एक जुना वृक्ष उन्मळून पडला. या घटनेत एक नागरिक जखमी तर दोन कारचे नुकसान झाले. दरम्यान, आरटीओ कार्यालय परिसरात अनेक मोठे आणि जुने वृक्ष असून, त्याच्या फांद्या पडून किंवा वृक्ष उन्मळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे वेळीच सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करणे महत्वाचे आहे.
लर्निंग लायसन्ससह विविध वाहतुकीसंदर्भातील कामासाठी हजारो नागरिक पुणे आरटीओ कार्यालयात येतात. कार्यालयाच्या चारही बाजूने जुने आणि मोठे वृक्ष उभी असून, त्यातील काही वृक्षांच्या फांद्या वाकल्या आहेत. तर, काही झाडे इमारतीमुळे तग धरून आहेत. शुक्रवारी (दि. १९) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास लर्निंग लायसन्स विभागासमोर असलेला जुना वृक्ष अचानक उन्मळून पडला.
यावेळी एक ज्येष्ठ नागरिक पार्किंग केलेल्या कारजवळ उभे होते. त्यांच्या डोक्याला फांदीचा फटका बसला, जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी वृक्षाच्या फाद्या कापून परिसर सुरक्षित केला.
आरटीओ कार्यालयात वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटना घडल्यानंतर पुणे आरटीओ प्रशासनाने तत्काळ उद्यान विभागास पत्रव्यवहार करून कार्यालय परिसरातील जुने वृक्ष व फांद्या वाकल्यामुळे धोकादायक झाले आहेत. भविष्यातील अपघात टाळण्यासाठी येथील धोकादायक वृक्षांची उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे.





