Pune News – अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे आखाती देशांमधील युध्दपरिस्थिती चिघळल्याने देशातून होणारी मासळीची निर्यात पूर्ण ठप्प झाली आहे. परिणामी, देशाच्या पश्चिम किनारपट्टीहून कुवेतमध्ये जाणाऱ्या डिलक्स पापलेटलाही त्याचा फटका बसला आहे. निर्यात बंद झाल्याने एरवी पुण्याच्या बाजारात कधीही न दिसणारा डिलक्स पापलेट मासा युध्दामुळे पुणेकरांच्या ताटात दिसू लागले आहे. गणेश पेठ येथील मासळी बाजारात दररोज ७० ते ८० किलो डिलक्स पापलेट दाखल होत असून त्याला किलोला १ हजार ९०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. देशाच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीहून ताजा तसेच शीतगृहातील पापलेटची निर्यात करण्यात येते. यामध्ये, कुवेतमध्ये डिलक्स पापलेटची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. ७०० ग्रॅमपासून ते एक किलोपर्यंत असणारा हा मासा कमी प्रमाणात मिळत असल्याने त्याला दरही चांगला मिळतो. त्यामुळे, या पापलेटची निर्यात करण्याकडे व्यापारी वर्गाचा कल जास्त असतो. युध्दामुळे निर्यात बंद झाल्याने ताजा डिलक्स पापलेट येथील बाजारात दाखल होत आहे. डिलक्स खेरीज एरवी दररोज बाजारात येणारे सुपर, कापरी आदी पापलेट बाजारात दाखल होत आहे. जास्तीत जास्त ५०० ते ६०० ग्रॅमपर्यंत बाजारात येत असलेल्या या पापलेटच्या किलोला १ हजार ५०० ते १ हजार ७०० रुपयांचा दर मिळत आहे. “आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीमुळे सध्या कुवेतसह इतर देशांकडे जाणारी पापलेटची निर्यात थांबली आहे. त्यामुळे एरवी परदेशात जाणारा डिलक्स पापलेट स्थानिक बाजारात येऊ लागला आहे. निर्यात पुन्हा सुरू झाली, तर स्थानिक बाजारातील ही आवक पुन्हा कमी होईल.” – ठाकूर परदेशी, मासळी विक्रेते, गणेश पेठ.