Pune News : भांडारकर रस्त्याच्या मधोमध पडले भले मोठे झाड, वाहतूक ठप्प

पुणे – भांडारकर रस्त्यावर रात्री आठच्या सुमारास एक मोठे झाड रस्त्याच्या मधोमध पडले. सुदैवाने यात कोणताही वाहन चालक अथका नागरिक सापडला नाही. मात्र यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी झाड कापून बाजूला केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार भांडारकर रस्त्यावर एचडीएफसी बँकेजवळ रस्त्याच्या कडेला मोठे झाड आहे. हे झाड अचानक कोसळले. यावेळी रस्त्यावर मोठी वाहतूक होती.
झाड कोसळताना आवाज झाल्याने रस्त्यावरील वाहन चालक सावध होऊन बाजूला झाले. यानंतर काही सेकंदातच झाड कोसळले. यामुळे दोन्ही बाजूने मोठी वाहतूक कोंडी झाली. नागरिकांनी पोलीस आणि अग्निशमन दलाला पाचारण केले.
डेक्कन पोलीस ठाण्याचे मार्शल सागर घाडगे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने वाहतूकीचे नियोजन केले. यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे एक तास प्रयत्न करुन झाडाच्या फांद्या कापून बाजूला केल्या. वाहतूक दुसऱ्या रस्त्यांवरुन वळविण्यात आल्याने इतर ठिकाणीही कोंडी झाली होती




