Pune News | स्वच्छतेकडे मोठं पाऊल ; सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आधुनिकीकरणासाठी ८४२ कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी

प्रभात वृत्तसेवा
पुणे – काही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचे अद्ययावतीकरण आणि काही प्रकल्पांची नव्याने उभारणी करण्यासाठी ८४२.८५ कोटीच्या कामासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यात २५२.८६ कोटी केंद्र सरकार, २१०.७१ कोटी राज्य सरकार तर २०.४९ कोटी महापालिका देणार असून, उर्वरित निधी ‘पीपीपी’ तत्वावर उभारला जाईल. कार्यादेशानंतर दोन ते तीन वर्षात हे प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे.पालिकेचे सध्या नऊ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) आहेत.
त्यांची क्षमता ४७७ दशलक्ष लिटर प्रति दिन (एमएलडी) आहे. हे एसटीपी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या जुन्या नियमावलीनुसार कार्यरत असून त्यात सांडपाण्यातून फॉस्फेट, नायट्रेट वेगळे करता येत नाहीत. हे एसटीपी १० ते १५ वर्षांपूर्वीचे असल्याने त्यांचे अद्ययावतीकरण करणे आणि इलेक्ट्रो मेकॅनिकल भाग बदलणे आवश्यक आहे. यासाठी सल्लागार नेमून अहवाल तयार करून घेण्यात आला आहे.
विठ्ठलवाडी, एरंडवणे, बोपोडी आणि नायडू (नवीन) या प्रकल्पांसाठी ‘इंटिग्रेटेड फिक्स्ड फिल्म स्लज प्रोसेस’ तर भैरोबा आणि तानाजीवाडी या प्रकल्पांसाठी ‘सिक्वेन्शियल बॅच रिॲक्टर’ या तंत्रज्ञानानुसार सांडपाणी शु्द्धीकरण प्रक्रिया करण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निकष साध्य होऊ शकतील. सध्याच्या नऊ प्रकल्पांपैकी बाणेर, खराडी, मुंढवा या तीन प्रकल्पांमध्ये ‘सिक्वेन्शियल बॅच रिॲक्टर’ या तंत्रज्ञानानुसार प्रक्रिया होत असल्याने येथे नूतनीकरणाची गरज नाही.
सर्व प्रकल्प अहवालांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने १६ जानेवारी २०२४ रोजी तांत्रिक मान्यता दिली आहे.अमृत २.० योजनेअंतर्गत सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी-हॅम) योजनेअंतर्गत प्रकल्पासाठी आठ मे २०२५ रोजी मान्यता मिळाली आहे. पालिकेने निविदाप्रक्रिया राबवली असून तीन ठेकेदारांनी निविदा सादर केली आहे. या निविदांची तांत्रिक छाननी केली जात आहे. या कामाचा कालावधी कार्यादेशानंतर दोन ते तीन वर्षांचा असेल. प्रकल्प मार्गी लागल्यानंतर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची एकत्रित क्षमता ८९ दशलक्ष लिटर प्रतिदिनने वाढून ५६६ दशलक्ष लिटर प्रतिदिन होईल.
“भैरोबानाला आणि तानाजीवाडी येथील एसटीपी पाडून नवे प्रकल्प उभारण्यात येतील. अन्य प्रकल्पांचे आधुनिकीकरण केले जाईल. यासाठी तीन निविदा प्राप्त झाल्या असून त्यांची छाननी सुरू आहे.”
-पृथ्वीराज बी.पी., अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका





