Pune News : पोलीस आयुक्तांच्या पत्नीचे 80 लाखांचे प्रकरण; व्यावसायिकाला अटकपूर्व जामीन मंजूर

पुणे : पुण्याच्या माजी आयुक्तांच्या पत्नीची 80 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या तरूण व्यावसायिकाला तपासास सहकार्य करण्याबरोबरच साक्षीदारावर दबाव न आणण्याच्या अटीवर जिल्हा व सत्र न्यायाधीश यू एम मुधोळकर यांनी कायमस्वरूपी अटकपूर्व जामीन मंजूर केला.
पिटर शुक्ला असे अटकपूर्व जामीन मंजूर झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. तरुण व्यावसायिकाने ॲड. विजयसिंह ठोंबरे यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.
माजी आयुक्त कै. वसंत बाळ मोडक यांच्या पत्नी अनिता मोडक यांनी ऑगस्ट 2023 मध्ये पिटर शुक्ला याच्या विरुद्ध ८० लाख घेऊन फसवणूक केल्यासंबंधी लेखी अर्ज दिला होता.
या तक्रार अर्जावर वारंवार व्यावसायिकाला क्राईम ब्रँच येथे बोलवून त्याला पैसे द्या अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येईल अशी ताकीद देण्यात आली होती. तरुण व्यावसायिकाने अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायाधीश एस बी हेडाऊ यांच्या न्यायालयात अर्ज केला.
त्यावेळी न्यायाधीश हेडाऊ यांनी आरोपीला अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. तब्बल एक वर्षानंतर मूळ अर्ज सुनावणी साठी आल्यानंतर ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी केवळ पैशाच्या वसुलीसाठी पोलीस यंत्रणेचा वापर करता येणार नाही.
आरोपीने अनिता मोडक यांना धनादेश देखील दिले असून, केवळ तत्काळ पैसे वसुलीसाठी बनावट गुन्हा दाखल करून व्यावसायिकाला त्रास दिला जात असल्याचा युक्तिवाद केला. न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून आरोपीला अटी शर्तींवर जामीन मंजूर केला.





