Pune News | ८ लाख पुणेकरांना वाहतूक कोंडींची शिक्षा

प्रभात वृत्तसेवा
पुणे – पुणेकरांच्या वेळेपेक्षा नेत्यांची वेळ महत्त्वाची असल्याने शहराचे प्रवेशद्वार असलेल्या सिंहगड रस्ता आणि पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलांचे उद्घाटन लांबणीवर पडले आहे. या दोन्ही पुलांचे काम पूर्ण झाल्याने १५ ऑगस्ट रोजी त्याचे उद्घाटन करण्यात येणार होते. उद्घाटनासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने ते लांबणीवर पडल्याचे आता स्पष्ट झाले आहे. यामुळे आठ लाख पुणेकरांना आणखी काही काळ तरी वाहतूक कोंडीची शिक्षा भोगावी लागणार आहे.
पुणेकर वाहतूक कोंडीत अडकून त्यांचा वेळ वाया गेला तरी चालेल, पण नेत्यांची वेळ मात्र मिळालीच पाहिजे, अशी प्रशासनाची किंवा नेत्यांची भूमिका आहे. त्याचा महापालिका निवडणुकीतही फायदा होईल अशा अंदाजाने पक्षाचे नेते तसा हट्ट धरत आहेत. या पुलांचे उद्घाटन १५ ऑगस्ट रोजी अचानक होऊ शकते, म्हणूनच १४ ऑगस्ट रोजी महापालिका, पोलीस तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी तेथील कामांची पाहणी केली होती. मात्र काही सूचना न आल्याने कामे अर्धवट असल्याचे सांगत पालिकेने दोन्ही पुलांचे उद्घाटन लांबणीवर टाकले.
सिंहगड रस्ता आणि पुणे विद्यापीठासमोरील आचार्य आनंद ऋषी चौकातून दररोज ८ ते १० लाख वाहने शहरात प्रवेश करतात. शहराच्या दक्षिण बाजूचे प्रवेशद्वार म्हणून कात्रज चौकासोबतच सिंहगड रस्ता ओळखला जातो. धायरी ते खडकवासला पर्यंत वाढलेल्या नागरी वस्त्यांसाठी हा शहरात येण्याचा प्रमुख मार्ग आहे. या रस्त्यावर दररोज ४ ते ५ लाख वाहनांची वर्दळ असते. हा रस्ता अरुंद असल्याने तसेच त्यावर चार ते पाच सिग्नल असल्याने मोठी कोंडी होत असते.
त्यामुळे महापालिकेने राजारामपूल ते फनटाईम असा २ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल उभारला. हे काम तीन टप्प्यात केले असून त्यातील दोन टप्पे सुरू झाले आहेत. तिसरा टप्पा गंगा भाग्योदय चौक ते विठ्ठलवाडीपर्यंत आहे. यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता शेवटच्या टप्प्याचेही काम पूर्ण झाले आहे. गणेशखिंड रस्त्यावर सुरू असलेला उड्डाणपूल हा मेट्रो आणि वाहनांसाठीचा दुहेरी पूल आहे. या ठिकाणी एकाच चौकात पाच रस्ते एकत्र येतात.
शहराच्या पूर्व भागातील औंध, पाषाण, बालेवाडी, बाणेरकडून येणाऱ्या वाहनांसाठी हा चौक शहरातील महत्त्वाचे प्रवेशद्वार आहे. या ठिकाणी २००५ मध्ये उड्डाणपूल उभारला होता. मात्र त्यानंतरही कोंडी कायम राहिली. त्यामुळे अवघ्या १५ वर्षांतच तो पूल पाडून प्रत्येक रस्त्यासाठी स्वतंत्र मार्गिका असलेला नवीन पूल बांधण्यात आला आहे. त्यात औंध रस्त्यावरून शिवाजीनगरकडे येणाऱ्या मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, उद्घाटनासाठी हा पूलही सध्या बंदच ठेवला आहे.





