प्रभात वृत्तसेवा पुणे – जिल्ह्यात म्हाडातर्फे ३५ हजार घरे बांधण्याचे नियोजन असून सुमारे १५ हजार घरांसाठी खेड आणि मुळशी तालुक्यात जमीन उपलब्ध झाली आहे. घरांसाठी सरकारी तसेच खासगी जागा घेऊन ही घरे बांधण्यात येणार आहे. पुणे शहराजवळील पाबळ (ता. शिरूर) येथे २५ एकर जागा उपलब्ध होणार असून खराबवाडी (ता.खेड) येथील घरांसाठी आराखडा अंतिम करण्यात आला आहे. शिरूर येथेही चार एकर जागेत नवीन योजना सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती म्हाडा पुणे विभागाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली. म्हाडाच्या घरांच्या सोडतीनंतर आढळराव पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. खेड तालुक्यातील रोहकल येथे ४० ते ४५ एकर जागा उपलब्ध झाली असून ९ ते १० हजार घरे बांधण्यात येणार आहेत. मुळशी तालुक्यातील नेरे येथे ८ ते ९ एकर जागा मिळाली असून त्याठिकाणी ५ हजार घरांचे नियोजन आहे. भोर येथे १२ एकर खासगी जागा उपलब्ध असून बाजारभावाने मिळाल्यास म्हाडा ती खरेदी करण्यास तयार आहे. महापालिका, नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या हद्दीत परवडणाऱ्या दरात जागा उपलब्ध झाल्यासही ती खरेदी करण्यात येईल, असेही आढळराव पाटील यांनी यावेळी सांगितले.दरम्यान, म्हाळुंगे येथील म्हाडाच्या योजनेतील घरे पडून आहेत. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही योजना राबवूनही त्याला प्रतिसाद मिळत नाही. या ठिकाणी रस्त्याची अडचण होती. आता ती दूर करण्यात आली आहे. सध्या, येथील ५० घरे भाडेतत्त्वावर देण्यात आली आहेत. ताथवडे येथील जागेवरील पहिल्या फेजमधील ६८९ घरांपैकी २८ घरे अद्याप शिल्लक आहेत. तर, फेज दोनमधील ७९२ घरांच्या विक्रीची प्रक्रिया सुरू आहे. याची किंमत ७४ लाखांवरून ६८ लाख करण्यात आली आहे, असेही आढळराव पाटील यांनी यावेळी सांगितले.