Pune News : बारावीतील मुलीचा छळ; पोस्को न्यायालयाने एकाचा जामीन फेटाळला

पुणे : बारावीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा सतत पाठलाग करणे, चिठ्ठ्या लिहणे , रस्त्यात अधेमध्ये थांबवून व हातवारे करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून वांरवार छळ केल्याप्रकरणी एकाला न्यायालयाने दणका दिला आहे.
पोस्कोचे विशेष न्यायाधीश के.पी.क्षीरसागर यांनी त्याचा जामीन फेटाळला आहे. वैभव राजेश जाधव असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण करणाऱ्या (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखलला आहे. त्याने केलेल्या जामीन अर्जास सरकारी पक्षाने विरोध केला.
सरकारी पक्षाला सहाय्य म्हणून पीडितेच्या वतीने ॲड. विजय श्रीभगवान आगरवाल यांनी युक्तिवाद केला. त्यांना या कामात ॲड. प्रियांका गजपोलू यांनी सहकार्य केले आहे. या प्रकरणात आरोपी तुरुंगात आहे. त्याने विशेष न्यायालयात अर्ज केला होता.
पीडितेच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले की, आरोपी हे विवाहित आहेत. त्यांच्या गैर कृत्यांमुळे फिर्यादी अल्पवयीन मुलीला समाजात वावरणे कठीण झाले आहे. तसेच, तिला प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले आहे. तिच्या शिक्षणावर परिणाम झालेला आहे. त्यामुळे जामीन फेटाळण्याची मागणी केली.





