Pune: पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा नव्याने ‘डीपीआर’

पुणे – पुणे रेल्वे विभागाकडून नव्याने पुणे-नाशिक सेमी हायस्पीड मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डिटेल प्रोजक्ट रिपोर्ट) तयार करण्यात आला आहे. तो रेल्वे बोर्डाला पाठविण्यात आला आहे. त्याच्या खर्चाबाबत अद्याप काहीही निश्चित नाही, अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनी दिली.
महाव्यवस्थापक मीना यांनी नुकतेच मनमाड ते दौंड या दुहेरी मार्गाची सुरक्षाविषयक पाहणी केली. त्यावेळी विविध कामांचा आढावा घेत लोकप्रतिनिधी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पुणे रेल्वेच्या व्यवस्थापक इंदु दुबे, मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला, उपव्यवस्थापक ब्रिजेश कुमार सिंह, वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ परिचालन व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे उपस्थित होते.
नारायणगाव जवळील जायंट मीटरव्हेव रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी) वेधशाळेच्या कामकाजावर या रेल्वे मार्गाचा प्रतिकूल परिणाम होत असल्याचे समोर आले. त्यामुळे सध्याच्या प्रस्तावित रेल्वे मार्गाला रेल्वे मंत्रालयाने परवानगी नाकारली आहे.
या मार्गाचा पुन्हा नव्याने डीपीआर बनवावा, अशा सूचना मध्य रेल्वेला दिल्या होत्या. त्यानुसार या मार्गाला फायनल लोकेशन सर्व्हे करून त्याचा ‘डीपीआर’ तयार केला आहे, अशी माहिती दुबे यांनी दिली. त्यामुळे या मार्गाला आता गती मिळण्याची अपेक्षा आहे.
पुणे-नगर मार्गाचाही डीपीआर
पुणे-नगरदरम्यान नव्या रेल्वे मार्गिकेचा फायनल लोकेशन सर्व्हे करण्यात येत आहे. त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचा डीपीआर व इतर कामे केली जातील, असे पुणे रेल्वे विभागाच्या व्यवस्थापक इंदु दुबे यांनी सांगितले. त्यामुळे पुणे-नगर नवीन रेल्वे मार्गामुळे वेळेची बचत होणार असून, प्रवासांना दिलासा मिळणार आहे. त्यामुळे या कामाला आता गती मिळाली आहे.





