पुणे : एनडीए कॅडेटनी सुरू केली भारताच्या चार कोपऱ्यात पदयात्रा

पुणे – ‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’ने (एनडीए) ७५ वर्षांचा स्थापना दिवस साजरा करताना अनेक उपक्रमांचे आयोजन केले आहे. त्यात कॅडेटने भारताच्या चारही कोपर्यात पदयात्रा काढली आहे. त्यातील दोन यात्रा जानेवारी २०२३ मध्ये झाल्या असून, एक डिसेंबरपासून उरलेल्या दोन भागातील यात्रांंना सुरुवात झाली आहे. या चारही कोपर्यांमध्ये पोहोचून त्यांनी तेथील भागात पायी यात्रा केली.
भारताचा दक्षिण कोपरा समजला जाणारा इंदिरा पॉइंट येथे एक ते नऊ डिसेंबरला टीम निघाली आहे. या टीममध्ये १० कॅडेट आणि तीन प्रशिक्षकांचा समावेश आहे. यामध्ये त्यांनी अनेक ऐतिहासिक आणि महत्त्वाच्या ठिकाणांना भेट दिली. त्यामध्ये अंदमान आणि निकोबार बेटे, इंदिरा पॉइंट, सेल्युलर जेल, अॅबरडीन बाजार, पीव्हीसी मेमोरियल आणि त्सुनामी स्मारकाला भेट दिली.
एनडीए कमांडंट व्हाइस अॅडमिरल अजय कोचर यांनी त्यांचे अभिनंदन केले. अंदमान आणि निकोबारचे प्रमुख कमांडंट एअर मार्शल साजू बालकृष्णन यांचे आभारही मानले. त्यानंतर भारताचा पूर्वेकडील कोपरा किबिथू यालाही त्यांनी भेट दिली.
टीमची महत्त्वाच्या ठिकाणांना भेट
या टीममध्येही १० कॅडेट आणि तीन प्रशिक्षकांचा समावेश आहे. यांनी किबिथू परिसरातील ऐतिहासिक आणि महत्त्वाच्या ठिकाणांना भेट दिली. त्यामध्ये वालोंग वॉर मेमोरियल, वाचा बॉर्डर मीटिंग पॉईंट आणि डिचू व्ह्यू पॉइंट यांचा समावेश आहे. चार डिसेंबर रोजी या टीमने किबिथू गावाला भेट दिली आणि स्थानिक लोकांशी संवाद साधला. याशिवाय तेथील शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांना सशस्त्र दलात सामील होण्याबाबत प्रेरित केले. १६ जानेवारी २०२४ ला ही पदयात्रा संपणार आहे




