Pune: राष्ट्रवादी काॅंग्रेसला हवाय शिवाजीनगर मतदारसंघ; शरद पवार यांच्याकडे पदाधिकाऱ्यांची मागणी

पुणे – विधानसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीत जागावाटपाची चर्चा सुरू आहे. त्यातच आता पुण्यातील जागावाटपात काॅंग्रेसच्या ताब्यात असलेल्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मिळावा, अशी मागणी तेथील पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली आहे.
शिवाजीनगर मतदारसंघ आधी शिवसेनेकडे होता. मात्र, आता शिवसेना महाविकास आघाडीत असून मागील दोन्ही निवडणुकांमध्ये येथून काॅंग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. तसेच या मतदारसंघात पक्षाची ताकद अधिक आहे. त्यामुळे हा मतदारसंघ आपल्याला मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
या मतदारसंघाचे अध्यक्ष उदय प्रमोद महाले, प्रदेश उपाध्यक्ष श्रीकांत पाटील, स्थायी समिती माजी अध्यक्ष नीलेश निकम, माजी नगरसेवक राजेश साने या वेळी उपस्थित होते. २००९ मध्ये या मतदारसंघातून स्वर्गीय आमदार विनायक निम्हण शिवसेनेच्या तिकिटावर आमदार झाले होते. त्यानंतर २०१४ मध्ये या मतदारसंघातून भाजपचे विजय काळे निवडून आले. तर २०१९ मध्ये भाजपचे सिद्धार्थ शिरोळे अवघ्या साडेपाच हजार मताधिक्क्याने निवडून आले आहेत. त्यानंतर मागील पाच वर्षांपासून काॅंग्रेसचे नगरसेवक दत्ता बहिरट या मतदारसंघात तयारी करत आहेत.
तर, विनायक निम्हण यांचे चिरंजीव तथा माजी नगरसेवक सनी निम्हण हेदेखील शिवाजीनगरमधून इच्छूक आहेत. काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांना थेट पक्षात येण्याचे निमंत्रण दिले आहे. त्यामुळे या मतदारसंघासाठी काॅंग्रेस देखील आग्रही असल्याचे चित्र आहे. पण, या वेळी राष्ट्रवादीकडून आता या मतदारसंघाची मागणी करण्यात आली आहे. येथून निवडणूक लढण्यासाठी उदय प्रमोद महाले, श्रीकांत पाटील, नीलेश निकम या मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छूक आहेत.





