पुणे – गेल्या पाच वर्षांत शिवाजीनगर मतदारसंघात सिद्धार्थ शिरोळे यांनी मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. त्यांचा या भागातील लोकांना दैनंदिन जीवनात फायदा होत आहे. शिरोळे यांचे कर्तृत्व आणि संयमी स्वभाव यामुळे ते बहुमताने निवडून येतील, यात शंका नाही. त्यांच्या विजयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाही महत्त्वाचा वाटा असेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी व्यक्त केला. या निवडणुकीत महायुती म्हणून सहभागी झालो आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शेकडो कार्यकर्ते संपूर्ण शहरात महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचत आहेत. भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची भरपूर मदत या निवडणुकीत सिद्धार्थ शिरोळे यांना मिळते आहे. शिवाजीनगर मतदारसंघापुरता विचार केला, तर एकूणच वातावरण खूप सकारात्मक आहे. त्यामुळे शिरोळे यांचा चांगल्या फरकाने विजय होईल, याची खात्री आहे, असेही मानकर यांनी सांगितले. महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार सहभागी आहेत. या सरकारने जनहिताच्या खूप योजना राबविल्या आहेत. गेल्या अडीच वर्षांत अनेक लोकोपयोगी योजना प्रत्यक्षात आणल्या आहेत. लाडकी बहीण योजना, युवक–युवतींसाठी रोजगाराच्या योजना, शिक्षणासाठी युवतींना मदतीसाठी योजना अशा अनेक योजनांचा लाखो नागरिक लाभ घेत आहेत. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मते पडतील, असेही मानकर म्हणाले. अनिल शिरोळे यांनी पाच वर्षे लोकसभेत पुण्याचे नेतृत्व केले. त्यानंतर पक्षनेतृत्वाने स्व. गिरीश बापट यांना तिकीट दिले; पण त्या आदेशाचा सन्मान राखून शिरोळे यांनी पक्षनिष्ठा कायम ठेवली आणि त्या निवडणुकीत बापट यांना निवडून येण्यासाठी सहकार्य केले. राजकीय जीवनात असा त्याग कोणी करत नाही. सेवा आणि त्यागाचा हाच वारसा सिद्धार्थ शिरोळे पुढे नेत आहेत, ही अभिमानाची गोष्ट आहे. जनमानसाशी जुळलेली नाळ हेच त्यांच्या यशाचे गमक असल्याचे मानकर यांनी नमूद केले.