Pune : नवले पूल आणि वडगाव पूल अपघाती स्पॉट

पुणे : पुण्यात वडगाव ब्रीजवर एका भरधाव मर्सिडिज कारने दुचाकीस्वारांना ठोकले. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. कारचालक मद्याच्या नशेत असल्याचे प्राथमिक तपासणीत उघड झाले आहे. दरम्यान, अपघातग्रस्त कार पुलावरून खाली पडल्याने चालकासह चौघे जखमी झाले आहे. कल्याणीनगर भागात मागील वर्षी मे महिन्यात भरधाव पोर्शे कारच्या धडकेत दुचाकीस्वार संगणक अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालच्या मुलाला ताब्यात घेण्यात आले. अपघातापूर्वी अगरवालचा अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या मित्राने एका पबमध्ये मद्यप्राशन केल्याचे तपासात उघडकीस आले होते.
कुणाल मनोज हुशार (२३ ,रा. चिंचवड) असे मृताचे नाव आहे. तर त्याचा साथीदार प्रज्योत दीपक पुजारी (२३, रा. चिंचवड) हाही घटनेत जखमी झाला आहे. कार चालक शुभम राजेंद्र भोसले (२३, रा. निगडी प्राधिकरण) याला सिंहगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्या सोबत कारमध्ये निखील मिलींद रानवडे (२६,रा. औंध गाव), श्रेयस रामकृष्ण सोळंखी ( २५, रा. चिंचवड) आणि वेदांत इंद्रसिंग रजपूत ( २८, रा. निगडी) हे तिघेही कारमध्ये होते. ते अपघातात जखमी झाले आहेत. आरोपी आणि त्याचे मित्र हे कॉम्पुटरमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही कार (एमएच ०१ बीके ४६२५) आरोपी शुभमच्या आईच्या नावाने आहे. शुभम शुक्रवारी रात्री कार घेऊन घरातून बाहेर पडला. त्याने सोबत निखील, श्रेयस आणि वेदांत यांना घेतले. हे चौघेही हिंजवडी येथे एका ढाब्यावर जेवण करायला गेले. तेथे जेवणाबरोबर मद्यपान केल्यावर लॉंग ड्राईव्हला जायचे ठरले. यानंतर शुभमने गाडी खेड शिवापूरला नेली. तेथून ते परतत असताना पहाटे साडेतीनच्या सुमारास वडगाव ब्रीजवर समोरील दुचाकीला धडकले. यानंतर कार पलटीखात पुलावरून खाली पडली. मात्र, गाडीची एअर बॅग उघडल्याने चौघेही बालंबाल बचावले. अपघातात मात्र दुचाकीवरील कुणाल आणि प्रज्योत गंभीर जखमी झाले. यात कुणालचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे
शंकरमहाराज मठात कीर्तनाला आले आणि…
अपघातातील मृत कुणाल आणि प्रज्योत हे बीएस्सी कॉम्पुटरचे शिक्षण घेतात. ते दोघेही चिंचवडवरुन शंकरमहाराज मठात कीर्तनासाठी आले होते. कीर्तनाचा कार्यक्रम उरकून ते घरी परतत असताना हा अपघात झाला. जिवलग मित्रांचा मृत्यू झाल्याचे कळाल्यानंतर चिंचवड परिसरात शोककळा पसरली. त्यांच्या कुटुंबीयांना धक्का बसला.
वेगमर्यादा ओलांडली
बाह्यवळण मार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी पोलिसांनी वेगमर्यादा निश्चित केली आहे. वेगमर्यादेबाबतचे फलक जागोजागी लावले आहेत. कारचालक शुभम याने दुचाकीला धडक दिली. कारचा वेग एवढा जोरात होता की, कार थेट वडगाव उड्डाणपुलावरुन खाली काेसळली. महागड्या मोटारीतील एअर बॅग यंत्रणा कार्यान्वित झाल्याने काररचालक शुभम याच्यासह त्याच्याबरोबर असलेले तीन मित्र बचावले. अपघाताची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या कुणाल आणि प्रज्योत यांना तातडीने खासगी रुग्णालयात नेले. अपघातग्रस्त मोटारीतील चौघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीत मोटारीतील तिघांनी मद्यप्राशन केल्याचे उघड झाले.
वडगाव उड्डाणपुलावर ट्रकच्या चाकाखाली सापडून एकाचा मृत्यू
वडगाव उड्डाणपुलावर शुक्रवारी (२ मे) सकाळी सातच्या सुमारास पादचाऱ्याचा ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. किरण पावनोजी गावडे-पाटील ( ३६, रा. गगनगिरी मंदिराजवळ, हिंगणे, कर्वेनगर) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुचाकीस्वार किरण हे शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास उड्डाणपुलावरुन निघाले होते. त्या वेळी भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता ट्रकचालक पसार झाला. किरण खासगी कंपनीत कामाला होते. पोलीस उपनिरीक्षक अमोल मालुसरे तपास करत आहेत.
दरम्यान, शनिवारी दुपारी पुन्हा एकदा नवले पुलाजवळ आणखी एक भीषण अपघात झाला. यामध्ये ब्रेक फेल झालेल्या ट्रेलर ट्रकने पाच वाहनांना धडक दिली. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला. घटनेत वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये एक कार, दोन रिक्षा आणि दोन दुचाकींचा समावेश आहे. जखमींना सिंहगड पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले आहे. तर ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. राहुल खाटपे (३२, रा.वडगाव) असे मृताचे नाव आहे. तो सिंहगड महाविद्यालयात सिक्युरिटी गार्ड म्हणून कार्यरत होता. ॲक्टिवावरून जाताना ब्रेक फेल झालेल्या ट्रेलरने त्याला ठोकरले होते. यात गाडीच्या चाकाखाली सापडून त्याचा मृत्यू झाला.





